सर्व अडचणींवर मात करून मुंबई विद्यापीठ अधिक पुढे जाईल : कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण 

नशिबाची साथ आणि कुटुंबीयांनी दिलेला भक्कम पाठिंबा या जोरावरच आपण मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदापर्यंत पोहचू शकलो. ५ भारतरत्न, एक पंतप्रधान, एक राष्ट्रपती या विद्यापीठाने देशाला दिले. मोठी परंपरा लाभलेले हे विद्यापीठ काहीसे अडचणीत असताना मला कुलगुरू पदभार मिळाला. मात्र सर्व अडचणींवर मात करून विद्यापीठ निश्चितच अधिक पुढे जाईल. असा विश्वास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी ओझर (मालवण) येथे बोलताना व्यक्त केला. मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्या मंदिर, कांदळगावच्या वतीने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर गृह अर्थराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जि.प. सदस्य हरी खोबरेकर, मुंबई-बांधकाम व्यावसायिक मंगेश सुर्वे, सह्याद्री परिसर शिक्षण प्र. मंडळ पाचल चे अध्यक्ष मनोहर खापणे, संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी जी.एस. परब यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दीपक केसरकर यांच्या हस्ते डॉ. सुहास पेडणेकर यांचा शाल श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला.

कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर म्हणाले,  मुंबई विद्यापीठाची धुरा माझ्याजवळ सोपविली आहे त्याचा आवाका वाढलेला आहे. ७९१ महाविद्यालये, ९ लाख विद्यार्थी, सात जिल्हे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येतात. माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत प्रत्येक महाविद्यालयात जाता येईल कि नाही एवढा मोठा पसारा मुंबई विद्यापीठाचा आहे, असे सांगून ते म्हणाले, सत्कार समारंभात अशाप्रकारे स्वतःचे प्रदर्शन करणे आवडत नाही. केवळ तुमच्या प्रेमाखातर आणि ज्या शाळेत मी घडलो म्हणून मी आज उपस्थित रहिलो.

यावेळी बोलताना खास. राऊत म्हणाले, मुंबई विद्यापीठाला आजपर्यंत जे कुलगुरू लाभले त्यातील दोन कुलगुरू सिंधुदुर्गातील होते. त्यातील डॉ. भालचंद्र मुणगेकर अर्थशास्त्रात पारंगत आहेत. तर दुसरे डॉ. सुहास पेडणेकर रसायनशास्त्रात पारंगत आहेत. सिंधुदुर्गात मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, अशी सिंधुदुर्गवासीयांची मागणी होती. त्यानुसार झाराप येथे उपकेंद्रासाठी २५ एकर जमीन दिली आहे. अद्याप काम सुरू झालेले नाही. डॉ.पेडणेकर यांच्या कुलगुरू पदाच्या काळात उपकेंद्राचे काम सुरू होऊन मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होईल असा आशावाद खास.राऊत यांनी व्यक्त केला.