दिवसाला फक्त 35 रुपये कमावणारा मुनाफ बनला क्रिकेटशौकिनांच्या गळ्यातला ताईत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

मानवी आयुष्य हे अडचणी आणि संकटांनी भरलेले असते. पण त्यातूनही तुमच्याकडे जिद्द, चिकाटी आणि गुणवत्ता असेल तर तुमचे नशीब फळफळायला वेळ लागत नाही. गुजरातच्या इखार या छोट्याशा गावात जन्मलेल्या आणि गरिबीत मोठा झालेल्या मुनाफ पटेलनेही आपल्या चिकाटीने क्रिकेट क्षेत्रात पदार्पण केले आणि एक नामांकित वेगवान गोलंदाज म्हणून सर्वत्र आपली ख्याती केली. ऐन उमेदीच्या काळात एका टाइल्स फॅक्टरीत 35 रुपये रोजावर काम करणार्‍या मुनाफची गोलंदाजीत चमक माजी हिंदुस्थानी यष्टिरक्षक किरण मोरे यांनी जाणली आणि परीसस्पर्श व्हावा तसे मुनाफचे आयुष्य आणि भाग्य उजळले.

दोनदा विश्वविजेत्या संघांचा सदस्य 

वेगवान गोलंदाजीत अफलातून यश मिळवणारा मुनाफ पटेल याने दोनदा विश्वविजेतेपद पटकावणार्‍या हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळवला आहे. 2007 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विश्वविजेतेपद पटकावले. संघाच्या विजयात मुनाफ पटेल याचाही सिंहाचा वाटा होता. त्यानंतर 2011 च्या आयसीसी विश्वचषकात धोनी ब्रिगेडने पुन्हा टीम इंडियाला क्रिकेटचे विश्वविजेते बनवले. मुनाफ याही गौरवशाली क्षणांचा साक्षीदार होता. या विश्वचषक स्पर्धेत मुनाफने 11 विकेटस् मिळवत युवराज सिंग आणि झहीर खान यांच्यानंतर सर्वाधिक विकेट मिळवणारा तिसरा गोलंदाज बनण्याचा पराक्रम साकारला.