रस्ते अपघात कमी करण्यासाठी नांदेड परिवहन विभागाकडून विशेष मोहीम

97

सामना प्रतिनिधी । नांदेड

रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग नांदेडच्या वतीने विशेष मोहिम राबविण्यात येणार असून या माध्यमातून जनजागृती त्यासोबतच करावयाच्या उपाययोजनांना प्राधान्य दिले जाईल, अशी भूमिका नांदेडचे नवनियुक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी सामनाशी बोलताना दिली.

नांदेड विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर तसेच वेगवेगळ्या विभागांचा, अधिकारी वर्गांचा आढावा घेतल्यानंतर आज त्यांनी सामनाशी बातचित केली. मुंबई येथे यशस्वीपणे कामगिरी बजावल्यानंतर त्यांची नांदेड येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून बदली झाली आहे. मराठवाड्यात यापूर्वी त्यांनी हिंगोली येथेही काम केले आहे. रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांची वाताहत होते, त्यांचे कुटुंब उदध्वस्त होते, या सर्व बाबी मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. भरधाव वेगाने गाडी चालविणे, स्पीड ब्रेकरचा विचार न करता गाडीच्या वेगावर नियंत्रण न ठेवणे, मद्यप्राशन करुन वाहने चालविणे आणि घाईगडबडीत नियोजितस्थळी पोहंचण्यासाठी धावपळ करणे यामुळे वेगवेगळे अपघात होतात. प्रामुख्याने पहाटेच्यावेळी झोप आली असताना देखील जबरदस्तीने गाडी चालविण्याचे प्रकार देखील यास कारणीभूत आहेत. यामुळे वाहन चालकांना प्रशिक्षण देणे, त्यांचे सर्वेक्षण करणे, अपघातस्थळांचे निरीक्षण करणे, जवळच्या असलेल्या पोलीस ठाणे व मदत केंद्राची पाहणी करणे, वाहन सुस्थितीत आहे की नाही यासाठी सर्वेक्षण करणे याबाबीवर जास्त भर राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.

ड्रंक अ‍ॅण्ड ड्रॉईव्हच्या प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रामुख्याने दुचाकीवर हे प्रमाण जास्त दिसून येते. मोठ्या वाहनात देखील याची अनेकदा प्रचिती येते. प्रवाशांनी देखील गाडीचा चालक चांगल्या पध्दतीने वाहन चालवितो आहे की नाही याची दक्षता डोळसपणे घेतली तर त्यावर देखील नियंत्रण ठेवता येईल. दारु पिऊन वाहन चालविण्याच्या प्रकारावर  नियंत्रण ठेवण्यासाठी सुरुवातीच्या काळात समजावून सांगणे व त्यानंतर कठोर कारवाई या भूमिकेतून आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेल्मेट सक्तीच्या संदर्भात जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालय, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यांची संयुक्त बैठक घेवून हळूहळू हेल्मेटचा विषय सार्वजनिक करुन अपघाताला विराम देण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेतले जाईल. वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी देखील वेगवेगळ्या कार्यशाळा तसेच प्रात्यक्षिके, पथनाट्ये यावर आपण भर देऊन शिस्त लावण्याचा प्रयत्न करु, असेही कामत यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या