टेरर फडींग प्रकरण – आंतरराष्ट्रीय दहशतवादी रिंदा संधू याच्या वडिलांना व भावाला नांदेडमधून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेरर फडींग प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अतिरेकी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधू यांचे वडील चरणसिंघ संधू आणि भाऊ सरबज्योतसिंघ संधू या पिता-पुत्रांना अटक करण्यात आली आहे.

पंजाब, हरियाणा, दिल्ली, नांदेड या परिसरात पोलिसांना हवा असलेला कुख्यात अतिरेकी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा सध्या फरार आहे. रिंदाचे नाव सांगून अनेकांनी खंडण्या वसुल केल्याचे गुन्हे देखील झाले आहेत. प्रख्यात व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी रिंदा पोलिसांना हवा आहे. रिंदाच्या नावावर खंडणी मागणार्‍या भरत पोपटानी याला 5 जुलै रोजी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला चौकशी करुन सोडून देण्यात आले. मंगळवारी रात्री पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली टेरर फडींगच्या प्रकरणात हरविंदरसिंघ उर्फ चरणसिंघ संधू आणि सरबज्योतसिंघ संधू या दोघांना अटक करण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणी खंडणी मागितल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. आज या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकूण न्यायाधीश मराठे यांनी या दोघांना 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

दरम्यान नांदेड शहरात गेल्या तीन चार महिन्यात रिंदाच्या नावावर खंडणी मागणार्‍या जवळपास बारा आरोपींना अटक करण्यात आली आहे. रिंदा या नावाची दहशत असल्याने काही व्यापारी व बिल्डर यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी व्यापारी व बिल्डरांना विश्वासात घेवून रिंदाच्या नावावर खंडणीची मागणी करणारे आरोपी यापूर्वी पकडले आहेत. आता रिंदाच्या वडिलांना व रिंदाच्या भावाला अटक करण्यात आल्याने या प्रकरणात आणखी नवीन माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.