एनडीआरएफच्या 9 तुकड्या 7 जिल्ह्यांमध्ये अगोदरपासूनच तैनात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली पावसाळापूर्व आढावा बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पावसाळापूर्व आढावा बैठक घेतली पावसाळय़ात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत असून ऐनवेळी मदत व बचावकार्य करण्याची वेळ येऊ नये म्हणून प्रथमच एनडीआरएफच्या 9  तुकडय़ा 7 जिह्यांमध्ये अगोदरपासूनच तैनात करण्यात आल्या आहेत.  ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक टीम 15 जूनपासून पोहोचतील, अशी माहिती मान्सूनपूर्व आढावा बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिली. आपत्कालीन कालावधीत शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे मान्सून पूर्वतयारीबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या दोन वर्षांत पावसाची सुरुवात ही वादळांनीच झाली आहे. यंदादेखील पाऊस चांगला पडेल असा अंदाज आहे. सर्व यंत्रणांनी आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे ही चांगली गोष्ट आहे.  जलसंपदा विभागाने धरणसाठय़ातील पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करून संबधित अधिकाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणीच राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस आयुक्त संजय पांडे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाऊस पडताना अभियंत्यांनी धरणांच्या जागेवरच राहावे

धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग हा नेहमीच महत्त्वाचा मुद्दा असतो. पूर नियंत्रण जलसंपदा विभागाचे अधिकारी नियोजनाने व्यवस्थितरीत्या पार पाडू शकतात. त्यादृष्टीने संबंधित अभियंत्यांनी या काळात कोणत्याही परिस्थितीत धरणाच्या जागेवरच राहावे आणि मुख्य अभियंता यांच्या परवानगीशिवाय अजिबात मुख्यालय सोडू नये, असे निर्देश आजच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले. पूर नियंत्रणाच्या दृष्टीने धरणातून किती पाणी कसे सोडण्यात येत आहे ते सर्वसामान्यांना रिअल टाइम कळावे म्हणून जलसंपदा विभागाने यंत्रणा विकसित केली असून त्याद्वारे धरण क्षेत्रातील व परिसरातील नागरिकांना आगाऊ सूचनाही मिळणार आहेत. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती ही माहिती जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरून 15 जूनपासून लाइव्ह पाहू शकतो. तंत्रज्ञानाचा अवलंब करून ही यंत्रणा उभारल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले व गेल्या वर्षी चिपळूण पुरानंतर आपण आढावा घेऊन यासंदर्भात दिलेल्या सूचनेप्रमाणे ही यंत्रणा सुरू होत आहे याचा निश्चित उपयोग होईल, असे  मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.