
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट-पीजी 2021) पुढे ढकलण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल वैद्यकीय क्षेत्रात नाराजी व्यक्त होत आहे. कोरोनाचे संकट वाढत असले तरी कुंभमेळा घेता येतो, निवडणुकींच्या रॅली निघू शकतात मग ‘नीट’ परीक्षा का घेतली जाऊ शकत नाही, असा सवाल डॉक्टरांनी केला आहे.
‘नीट-पीजी 2021’ परीक्षा 18 एप्रिल रोजी घेण्यात येणार होती, परंतु देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयावर डॉक्टरांच्या संघटना टीका करत आहेत. कर्नाटक असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सनी (कार्ड) सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. सरकार कुंभमेळा आणि निवडणूक रॅलींचे व्यवस्थापन करू शकते मग ‘नीट’ परीक्षेचे का करू शकत नाही? असे या संघटनेने अध्यक्ष डॉ. दयानंद सागर एल. यांनी म्हटले आहे.
‘नीट-पीजी’ देणारे विद्यार्थी नंतर कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सेवा देणार आहेत. त्यामुळे ही परीक्षा वेळीच घेतली गेली तर आणखी डॉक्टर्स उपलब्ध होतील असे इतर राज्यांतील डॉक्टरांचेही म्हणणे आहे. कोरोना वॉर्डात अधिक संसर्ग होऊ शकतो की परीक्षा केंद्रात, असा सवालही डॉक्टर करत आहेत. महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने अद्याप यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
एप्रिल सत्रातील जेईई-मेन ठरल्याप्रमाणेच
एप्रिल सत्रातील जेईई-मेन परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. 27 ते 30 एप्रिल या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. जेईई-मेनच्या फेब्रुवारी आणि मार्च सत्रातील परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. एप्रिल सत्रातील परीक्षा बी.टेक. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणार आहे. या परीक्षेला बसणारे विद्यार्थी त्यांची प्रवेशपत्रे jeemain.nta.nic.in या वेबसाइटवर जाऊन मिळवू शकणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकवर्गातून होत होती. मात्र परीक्षेची प्रवेशपत्रे जारी करण्यात आल्याने परीक्षा ठरल्याप्रमाणेच होणार हे स्पष्ट झाले आहे.




























































