न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात नववर्षाचं जल्लोषात स्वागत; आतषबाजीने आसमंत उजळला

नवीन वर्षाचे वेध सर्वानाच लागले आहेत. अनेकजण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटनस्थळी गेले आहेत. तसेच अनेकांनी नवीन वर्षांचे संकल्पही केले आहेत. देशात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच जगातील काही देशात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात सर्वात आधी नववर्षाचे आगमन होते. तेथे नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला आहे.

जगभरातल्या काही देशांमध्ये नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. सर्वात आधी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातल्या नागरिकांनी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले आहे. न्यूझीलंडमधील पूर्वेकडील ऑकलंडमध्ये नववर्षाचा जल्लोष सुरू आहे. एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. आधी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात आतषबाजीने नवीन वर्षाचे दणक्यात स्वागत करण्यात आले.

ऑस्ट्रेलियामधील सिडनी हार्बर पूलावर आकर्षक आतषबाजी करण्यात आली. येथे मोठ्या लाईट शोचे आयोजनही करण्यात आले होते. 10 लाखांहून अधिक लोक सिडनी हार्बर पूल परिसरात जमतात. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या 20 टक्के लोक इथे जमतात. ओशनिया खंड ज्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी आणि पापुआ न्यू गिनी यासारखे बेटांचे देश आहेत. तेथे नवीन वर्षाचे प्रथम स्वागत केले जाते. किरिबाटी मधील किरितीमाती बेट हे नवीन वर्ष साजरे करणारे पहिले ठिकाण आहे. त्याचप्रमाणे टोंगा, सामोआ आणि किरिबाटी यांनी प्रथम नवीन वर्षाचे स्वागत केले, त्यानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं.