‘इफ्फी’च्या पॅनारोमा विभागात एकही मराठी चित्रपट नाही

‘इफ्फी’ अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मुख्य घटक असलेल्या ‘इंडियन पॅनोरमा’अंतर्गत दाखवल्या जाणार असलेल्या 25 फिचर आणि 20 नॉन फिचर चित्रपटांची नुकतीच घोषणा करण्यात आली. कथाबाह्य विभागातील तीन लघुपट सोडले तर चित्रपट विभागात एकाही मराठी चित्रपटाला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे नाराजीचा सूर पसरला आहे.

गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर या काळात यंदा ‘इफ्फी’ महोत्सव रंगणार आहे. इंडियन पॅनोरमा विभागातल्या फिचर फिल्मकरिता एकूण 408 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून वैशिष्टय़पूर्ण 25 चित्रपटांचे पॅकेज निवडण्यात आले आहे. या यादीत सहा मल्याळम, तीन बंगाली आणि इतर कन्नड, तमिळ, हिंदी भाषेतील चित्रपटांचा समावेश आहे. मात्र या यादीत एकाही मराठी चित्रपटाला स्थान मिळवता आले नाही. कथाबाह्य चित्रपट विभागात सुमिरा रॉय यांचा ‘भंगार’, प्रथमेश महालेंचा ‘प्रदक्षिणा’ आणि अभिजित अरविंद दळवी यांचा ‘उत्सवमूर्ती’ या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. इंडियन पॅनोरमाअंतर्गत फिचर फिल्म श्रेणीत उद्घाटनीय चित्रपट म्हणून ‘अट्टम’ या मल्याळम चित्रपटाची तर नॉन फिचर फिल्म श्रेणीत ‘एंड्रो ड्रीम्स’ या मणिपुरी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.