रायगडात पावणेचार लाख मतदारांना नोटिसा, कागदपत्रे, पुरावे, जुन्या नोंदी जुळवताना मतदारांची दमछाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराचा रायगडातील पावणेचार लाख मतदारांना फटका आयोगाच्या श्रष्ठ कारभाराचा मतदारांना एसआयआरच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून सुनावण्यांच्या ससेमिऱ्याने सर्वसामान्यांना अक्षरशः नकोसे झाले आहे. कागदपत्रे, पुरावे, जुन्या नोंदी जुळवताना मतदारांच्या नाकीनऊ आले आहे. प्रारूप मतदार यादीत नावे प्रसिद्ध होऊनही हा ससेमिरा सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात पनवेलमध्ये सर्वाधिक १ लाख ५० हजार ४२४ मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

एसआयआर प्रक्रियेंतर्गत मतदारांची २००२च्या मतदार यादीशी जोडणी करण्यात आली. त्याचबरोबर गणना प्रपत्रांचे संकलन करून पुढील कार्यवाही करण्यात आली आणि त्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. मात्र प्रारूप यादीत नाव समाविष्ट झाल्यानंतरही मोठ्या संख्येने मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्याने या प्रक्रियेच्या अचूकतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. मतदार यादीत नाव असतानाही पुन्हा कागदपत्रे सादर करण्याची वेळ येत असेल तर मग आधीच्या पडताळणी प्रक्रियेचा नेमका उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

॥ मतदार यादी अचूकतेच्या नावाखाली पात्र मतदारांना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची वेळ येत असेल तर या प्रक्रियेची पारदर्शकता आणि कार्यक्षमता तपासण्याची गरज आहे.

॥ प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही एवढ्या मोठ्या संख्येने नोटिसा बजावण्यात आल्याने पडताळणी प्रक्रियेत नेमक्या कोणत्या त्रुटी राहिल्या, याचे स्पष्टीकरण निवडणूक विभागाने द्यावे, अशी मागणी होत आहे.

वडील-मुलांच्या वयातील अंतरावरही आक्षेप !

 SIR नोटिसा बजावण्यामागील कारणांमध्ये २००२च्या मतदार यादीशी योग्य प्रकारे जोडणी न होणे, नोंदींची चुकीची जोडणी झाल्याची शक्यता तसेच कुटुंबातील सदस्यांच्या वयासंदर्भातील विसंगती यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. काही प्रकरणांत वडील आणि मुलांच्या वयातील अंतर योग्य वाटत नसल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. विवाहानंतर नावात बदल झालेल्या महिला मतदारांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नोटिसा बजावण्यात आलेल्या मतदारांची संख्या (विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी)

पनवेल : १ लाख ५० हजार ४२४

उरण : ५८ हजार ६९८

अलिबाग : ४२ हजार ७४१

महाड : ४२ हजार ४३३

कर्जत-खालापूर : ३३ हजार २९४

पेण : ३० हजार ३८१

श्रीवर्धन : २४ हजार ८६०