मोदींवर टीका केली म्हणून संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली म्हणून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध यवतमाळमधील उमरखेड पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दैनिक ‘सामना’तील रोखठोक या सदरात नरेंद्र मोदी यांच्यावर टीकात्मक लेखन केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पाडल्या.  या निवडणूक निकालांचे विश्लेषण ‘रोखठोक’ या सदरातून करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह व प्रक्षोभक असे लेखन केल्याचा आरोप करत भाजपचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावरून आज संजय राऊत यांच्या विरोधात भादंवि कलम 153 (अ), 505 (2), 124 (अ) अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मग अमित शहांवर गुन्हा दाखल करणार काय?

अमित शहांनी 370 कलमासंदर्भात पंडित नेहरूंवर टीका केली म्हणून कोणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे का? या देशात लोकशाही आहे, संविधान आहे. अद्याप हुकूमशाही, आणीबाणी लावलेली नाही किंवा आमच्या जिभा कापून टाकलेल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.