
सामना प्रतिनिधी । पुणे
तमिळनाडू येथील बनावट नोटांचे रॅकेट समोर आल्यानंतर आता देहरोड येथून एकाला 200 ची बनावट नोट तयार करताना गुन्हे शाखेच्या युनीट चारने अटक केली आहे. युट्यूबवर व्हिडीओ बघून नोटा तयार करायला शिकल्याचे समोर आले आहे. त्याच्या घरातून सात बनावट नोटा, प्रिंटर, कागद जप्त केला आहे. सोलेह सलीम शेख (वय 21, रा. गांधीनगर वस्ती, देहूरोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
सोहेल शेख हा आरटीओ एजंट म्हणून काम करणार होता, त्यासाठी त्याला लॅपटॉपही घेऊन देण्यात आला होता. सोहेलने यूट्यूबवर बनावट नोटा तयार करण्याचा व्हिडीओ पाहिला. त्यानुसार त्याने दोनशे रूपयची नोट स्कॅन केली, त्यांनी त्याची करल प्रिंटरवरून कॉपी काढली. त्याने 2000 व 500 चीही बनावट नोट तयार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या रंगामध्ये फरत येत होता. मात्र, 200 ची प्रिंट हुबेहुब येत असल्याने त्याने या नोटा छापण्याचा सपाटा लावला होता.
शेख हा नगरपतगिरी चौकात येणार असल्याची माहिती युनीट चारचे कर्मचारी शंकर संपते यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने त्याला सापळा रचून पकडले, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांनी दिली. पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहाय्यक निरीक्षक अश्विनी जगताप, सुनिल पवार, सचिन ढवळे, रमेश चौधर यांनी ही कामगिरी केली.
प्रिंटरसाठी घेतले 27 हजाराचे कर्ज
12 वी नापास असलेल्या शेखने बनावट नोटा तयार करण्यासाठी एका शोरूममधून 27 हजार रूपयांचे कलर प्रिंटर विकत घेतेल. गेल्या पंधरा दिवसांपासून तो वृद्ध भाजी विक्रेते, पानटपरी, छोटे दुकानदार यांच्याकडे खरेदी करून नोटा चलनात आणत होता.



























































