ऑनलाईन फसवणूक प्रकरणी एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन फसवणूक प्रकरणी माहीम पोलिसांनी रविंद्रकुमार लक्ष्मण सिंग याला अटक केली  असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अपहार केलेल्या पैशातून त्याने सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात तक्रारदार तरुणी असून ती माहीम परिसरात राहते. तिचे एका खासगी बँकेत खाते असून त्या खात्याचा वापर तिची मावशी करते. ऑक्टोबरमध्ये तक्रारदार तरुणीची मावशी परदेशात असताना मोबाईलवर एक लिंक होती. ती लिंक ओपन केल्यावर बँकेचे पेज उघडले. त्यांनी गोपनीय माहिती त्या लिंकवर भरली. त्यानंतर तक्रारदार यांच्या खात्यातून 99 हजार रुपये काढले गेले. बँक खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात येताच त्यानी माहीम पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

फसवणुकीची रक्कम एका पेटीएम अकाउंट मध्ये जमा झाली होती. त्याच अकाउंट मधून ऑनलाईन एका गोल्ड फायनान्स मधून काही सोने खरेदी केले होते. त्याची माहिती समजताच माहीम पोलीस राजस्थानला गेले. सोने खरेदी करणाया रवींद्र ला पोलिसांनी बेडया ठोकल्या. त्याच्याकडून दोन बांगडया, झुमके, माळ जप्त केली आहे. रवींद्रचे दोन बँक खाते आहेत. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. रवींद्रच्या वतीने ऍड. सुनील पांडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. रवींद्रच्या कागदपत्रे आणि सिम कार्डचा गैर वापर केला आहे. पैसे खात्यात जमा झाल्याचे लक्षात येताच त्याने बँकेला पैसे परत केल्याचे पांडे यांनी न्यायालयात सांगितले.