
अट्टल चोरांच्या टोळीला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी वेशांतर करण्याचं कौशल्य दाखवत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीला अटक करण्यासाठी प्रेमी युगुलापासून ते हॉटेलच्या वेटरपर्यंत वेगवेगळ्या वेशभूषा करत ही मोहीम फत्ते करण्यात आली.
या सगळ्याची सुरुवात झाली ती मालाड पश्चिम येथे राहणाऱ्या एका वृद्धेच्या तक्रारीमुळे. 31 जानेवारी रोजी वाढदिवसानिमित्त ही वृद्धा महालक्ष्मी मंदिरात गेली होती. ती दुपारी एक वाजता घराबाहेर पडली ती रात्री दहा वाजता घरी परतली. या इमारतीला कुणीही सुरक्षारक्षक नाही. जेव्हा ही वृद्धा घरी परतली तेव्हा तिला दिसलं की घरातून 32 इंचाचा टीव्ही, हिऱ्याचे आणि मोत्यांचे दागिने, रोकड असा एकू 21 लाखांचा ऐवज गायब होता.
वृद्धेने पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली. त्यात चोर एका टॅक्सीतून जात असल्याचं त्यांना आढळलं. टॅक्सीची नंबरप्लेट अस्पष्ट दिसत होती. पण, टॅक्सीवर अशी काही चित्र छापली होती, ज्यामुळे ती टॅक्सी वेगळी दिसत होती. पोलिसांनी त्या वर्णनावरून तपास सुरू केला. तेव्हा त्यांना ही टॅक्सी घाटकोपर परिसरात आढळली. या टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा नौशाद खान याच्यावर दोन दिवस पाळत ठेवून त्याला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांना त्याच्या चौकशीत त्याच्यावर संशय आला. मात्र, हे त्याच्या एकट्याचं काम नसल्याने त्याच्या सहआरोपींना पकडणं एक आव्हान होतं. कारण त्याच्या सहआरोपींवर आधीच वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल होते.
या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी अखेर वेशांतराचं साहाय्य घेण्याचं ठरवलं. या प्रकरणातील आरोपींचा गुन्ह्याचा इतिहास लक्षात घेऊन पोलिसांनी नौशादचा फोन बंद न करता त्याला वेळोवेळी त्यांच्या संपर्कात ठेवलं. त्यामुळे नौशादपर्यंत पोलीस पोहोचले आहेत, याचा पत्ता उरलेल्या आरोपींना लागला नव्हता. या कामात त्याला सद्दाम खान, अब्दुल पठाण आणि रॉनी फर्नांडिस यांनी मदत केली होती. तसंच गुड्डू सोनी नावाच्या एका आरोपीने त्यांच्याकडून चोरीचे दागिने खरेदी केले होते. सद्दामच्या नावावर 33 गुन्ह्याची नोंद असून गुड्डूवरही रेल्वे पोलिसात 39 गुन्हे दाखल आहेत.
यातील सद्दाम याला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्या नेहमीच्या दारूच्या अड्ड्यावर वेटरच्या वेशात नजर ठेवली. तर फर्नांडिसला पकडण्यासाठी पोलिसांनी रिक्षाचालकाचा वेश करून नौशाद आणि त्याची भेट घडवून आणली. दुसरीकडे दोन पोलिसांनी प्रेमी युगुल आणि उर्वरितांनी फेरीवाल्यांचा वेश धारण केला आणि त्यांनी पठाणवर पाळत ठेवली. या सगळ्यांना सापळा लावून पकडण्यात आलं. मालाड पोलिसांनी त्यांच्याकडून टीव्ही सेट आणि हिऱ्यांचा सेट असा 16.6 लाखांचा ऐवज वसूल केला आहे.
































































