चार तासांत शोधली परदेशी महिलेची पर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

रशियन महिलेची हरवलेली बॅग अवघ्या चार तासांत ओशिवरा पोलिसांच्या विशेष पथकाने शोधून काढली. हरवलेली बॅग मिळाल्यामुळे महिलेने ओशिवरा पोलिसांचे आभार मानले. तसेच मुंबई पोलीस जगातील उत्कृष्ट पोलीस असल्याची भावना तिने केली.

इरिना नेस्टोनोवा ही मूळची रशियाची रहिवासी आहे. ती खासगी कंपनीमध्ये एचआरचे काम करते. ती गेल्या वर्षी संशोधनाकरिता हिंदुस्थानात आली होती. पाच दिवसांपूर्वी नेस्टोनोवा ही मुंबईत आली. तिला मुंबईची फारशी माहिती नव्हती. मंगळवारी नेस्टोनोवाने अंधेरीच्या हॉटेल येथून लोखंडवालाला जाण्यासाठी रिक्षा पकडली. प्रवासात तिची बॅग कुठे पडली हे तिला समजले नाही. नेस्टोनोवा ही रडत ओशिवरा पोलीस ठाण्यात आली. तिने घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. तिच्या बॅगेत 70 हजार रुपये होते. बॅग हरवल्यामुळे ती हॉटेललाही जाऊ शकत नव्हती. वरिष्ठ निरीक्षक शैलेश पासलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन गिजे, पोलीस हवालदार लक्ष्मण बागवे, मनोज सकपाळ यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. तसेच 15-20 रिक्षावाल्यांची चौकशी केल्यानंतर तपासाची चक्रे फिरली. अखेर लोखंडवाला परिसरात शोध घेऊन पोलिसांनी नेस्टोनोवाची बॅग अवघ्या चार तासांत शोधून तिच्याकडे सुपूर्द केली. अवघ्या चार तासांत बॅग शोधून दिल्यामुळे तिने ओशिवरा पोलिसांच्या कामाचे कौतुक केले.