बंडखोर संदिपान भुमरेंच्या शहरात अंधाराचं साम्राज्य; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता असलेल्या पैठण नगर परिषदेकडे 9 लाख रुपयांचे बील थकल्यामुळे महावितरणने शहरातील पथदिव्यांचा विजपुरवठा खंडीत केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 8 दिवसांपासून हे तीर्थक्षेत्र अंधारात असून वारकरी व पर्यटकांची कुचंबणा होत आहे. बाजारपेठेवरही विपरीत परिणाम झाला आहे. मात्र या भागातील बंडखोर आमदार संदिपान भुमरे याविषयी काही हालचाल करताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेत शिवसैनिकही याबाबत रस्त्यावर उतरले असून वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

पैठण नगर परिषदेत प्रशासक असून अगोदरच नागरी सुविधांची वानवा असताना दि. 26 जूलै रोजी शहरातील पथदिव्यांचा विजपुरवठा खंडीत झालेला आहे. याबाबत माहिती घेतली असता शहरातील पथदिव्यांचे चालू महिन्याचे जवळपास 9 लाख रुपयांचे बील भरले नसल्याने महावितरणने वीज तोडल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान नागरिक व व्यापाऱ्यांनी याबाबत मुख्याधिकारी संतोष आगळे यांना निवेदन देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.