शुजात बुखारी हत्येचा कट पाकिस्तानात शिजला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,श्रीनगर

श्रीनगर येथील ‘रायझिंग कश्मीर’ या दैनिकाचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येचा कट हा पाकिस्तानात रचला आणि यामागे दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’चा हात आहे, अशी धक्कादायक माहिती कश्मीरचे पोलीस महानिरीक्षक एस. पी. पानी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. या हत्येसंदर्भात आमच्याकडे सबळ पुरावे आहेत. यातून या हत्येचे कटकारस्थान सिद्ध होईल, असा दावा पानी यांनी केला.

हत्येचा सूत्रधार एमबीए

हत्येचा सूत्रधार सज्जाद गुल (४८) हा श्रीनगरचा असून त्याने बंगळुरू येथील एका खासगी संस्थेतून एमबीए केलेले आहे. तो सध्या पाकिस्तानात रावळपिंडीस फरार झाला आहे, अशी माहिती गुप्तचरांनी दिली आहे. बुखारी यांना ठार करण्याचा आदेश ‘लष्कर-ए-तोयबा’ प्रमुख हाफिज सईद याच्याकडून आली. त्यानंतर सज्जाद गुल याने हे काम कश्मीरमधील दहशतवाद्यांवर सोपवले. या दहशतवाद्यांची निवडही गुल यानेच केली होती.

हत्येतील चारही आरोपींची ओळख पटली

या हत्येतील चारही आरोपींची ओळख पटल्याचे पानी यांनी जाहीर केले. हत्येचा सूत्रधार सज्जाद गुल, नावेद जद्द, आजाद अहमद मालिक, मुजफ्फर अहमद भट अशी आरोपींची नावे आहेत. शुजात बुखारी यांच्या हत्येनंतर घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेला जुवैद नामक संशयितास पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेली आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन, एक पिस्तोल जप्त केलेला आहे. शिवाय त्याचा या हत्येतील सहभाग तपासण्यात येत आहेत. या आरोपींपैकी एक आरोपी हा मोटरसायकलवर घटनास्थळी आलेला होता, असे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.