
संसदेच्या आवारात धुराच्या नळकांड्या फोडल्याप्रकरणी लातूरमधील झरा गावच्या अमोल शिंदे याला अटक करण्यात आली आहे. अमोल सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या आई वडिलांचे गेल्या दोन दिवसांपासून त्याच्याशी बिलकूल बोलणे झालेले नाही. बुधवारपासून अमोलचे पालक त्याच्याशी बोलण्याची वाट पाहत असून अद्याप त्यांचे बोलणे झालेले नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी दोन ते तीन दिवसात आमचं अमोलशी बोलणं झालं नाही तर आत्महत्या करेन असा इशारा दिला आहे.
अमोलच्या आई वडिलांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अमोलबाबत सांगताना हा इशारा दिला. ”अमोल हा बेरोजगार होता. तो देखील आमच्यासोबत मजूरीची कामं करायचा. सात ते आठ वेळा त्याने लष्कर भरतीसाठी प्रयत्न केले होते. जिथे जिथे भरती असायची तिथे जायचा मात्र त्याला यश मिळत नव्हतं”, असे अमोलचे वडील धनराज शिंदे यांनी सांगितले.
अमोलने दिल्ली जाण्याआधी विहीर खोदण्याचे काम घेतलं होतं. त्यासाठी त्याला पाच हजार रुपये मजूरी मिळाली होती. त्याने मित्राकडून दोन हजार रुपये उधार घेतले होते. त्यानंतर तो दिल्लीला गेला. लातूरवरून त्याने भगत सिंगाचा फोटो असलेले टीशर्ट आणले होते ते घालूनच तो दिल्लीला गेला. आम्ही नवरा बायको शेतमजूरी करून घर चालवतो. त्याला लागतील तेव्हा पैसे दिले. कष्ट करून त्याचे शिक्षण पूर्ण केले. मात्र त्याला नोकरी लागत नव्हती, असे त्याच्या वडिलांनी सांगितले.
अमोल शांत स्वभावाचा आहे. बरेच प्रयत्न करूनही त्याला नोकरी लागत नव्हती. त्याने असे केल्याने आम्हालाही धक्का बसला आहे. त्यामुळे मला माझ्या मुलाशी बोलायचे आहे. माझं बोलणं करून द्या अन्यथा मी आत्महत्या करेन असा इशारा धनराज शिंदे यांनी दिला आहे.


























































