पर्रिकरांच्या मुलाची भाजपला धमकी; तिकीट द्या, नाहीतर वेगळा विचार करेन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वीच भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भाजपने मला पणजी मतदारसंघातून तिकीट द्यावे, नाहीतर वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा थेट इशाराच उत्पल पर्रिकर यांनी दिला आहे. उत्पल हे दिवंगत माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत.

मनोहर पर्रिकर यांनी 25 वर्षांपेक्षा जास्त काळ पणजी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. सध्या अतानासियो मोन्सेराते हे येथील आमदार आहेत. मोन्सेरातेंसह दहा काँग्रेस आमदारांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मोन्सेरातेंना पणजीतून उमेदवार देण्याचे भाजपने निश्चित केल्याची चर्चा असतानाच उत्पल पर्रिकर यांनी थेट भाजपलाच इशारा दिला आहे. पत्रकारांशी बोलताना उत्पल पर्रिकर म्हणाले, मला पणजीतून उमेदवारी हवी, असे मी पक्षाला सांगितले आहे. मला खात्री आहे पक्ष तिकीट देईल; पण दिले नाहीतर वेगळा विचार करावा लागेल.

मनोहर पर्रिकर यांना आयुष्यात सहजासहजी काही मिळाले नाही. मलाही त्याच पद्धतीने काम करावे लागेल. मला काही कठीण निर्णय घेण्यास भाग पाडले जाऊ शकते. त्यासाठी मला शक्ती मिळावी, अशी मी प्रार्थना करतो, असे उत्पल पर्रिकर यांनी सांगितले.