हीन दर्जाचे राजकारण करणाऱ्या अपप्रवृत्तींना जनतेनेच रिंगण दाखवावे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 ‘वाखरी येथे सर्व वारकरी दिंडय़ा विसाव्यास येतात. गुढीपाडव्याच्या दिवशी येथे प्रचारास येणे हा माझ्यासाठी भाग्यवह योगायोग आहे. ही निवडणूक ‘पक्ष विरुद्ध पक्ष’ अशी नसून, आता ‘सत्य विरुद्ध प्रत्येक गोष्टीत हीन दर्जाचे राजकारण करणाऱ्या अपप्रवृत्ती’ अशी आहे आणि या अपप्रवृत्तींना येथील जनतेनेच आता ‘रिंगण’ दाखवावे,’ असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

पंढरपूर तालुक्यातील वाखरी व मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे धनंजय मुंडे यांच्या जोरदार प्रचारसभा झाल्या. या सभेला आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपकआबा साळुंके-पाटील, माजी आमदार राजू आवाळे, उमेश पाटील, उमेदवार भगीरथ भालके, साईनाथ अभंगराव, दिलीप धोत्रे, कल्याण आखाडे, सुधीर भोसले, शलाका पाटील, शालिवाहन कोळेकर, श्रेया भोसले, संग्राम गायकवाड, सुवर्णा बागल, संदीप मांडवे, शुभांगी भोईटे, मारुती पोरे, ऍड. राजेश भादुले, नागेश यादव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

भारतनाना आपल्याला अर्ध्यावर सोडून जातील आणि त्यांच्या जागी त्यांच्या मुलाचा प्रचार करण्याची वेळ माझ्यावर येईल, असे मला कधी वाटले नव्हते. नानांनी मला नेहमीच वडिलकीची माया दिली. आज त्यांच्या जागी पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव भगीरथ उभे आहेत. भगीरथ हे नानांचे केवळ रक्ताचे नाही, तर त्यांच्या विचारांचे आणि या भागाच्या विकासाचे जे स्वप्न नानांनी पाहिले, त्या स्वप्नाचे वारसदार आहेत. या वारसदारासाठी मी आशीर्वाद मागायला आल्याची भावनिक साद मंत्री धनंजय मुंडे यांनी घातली.