
सामना ऑनलाईन, मुंबई
प्रसिद्ध उद्योगपती विजयपत सिंघानिया हे लिहीत असलेल्या ऑटोबायोग्राफीला आव्हान देणारी त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया याची याचिका मुंबईतील शहर दिवाणी न्यायालयाने आज फेटाळून लावली. या ऑटोबायोग्राफीबद्दल गौतम सिंघानिया यांनी केलेले आरोप ते सिद्ध करू शकलेले नाहीत. त्यामुळे न्यायालय त्यांची याचिका फेटाळून लावत आहे, असे स्पष्ट मत दिवाणी न्यायाधीश एस.पी. पोंक्षे यांनी या वेळी व्यक्त केले. विजयपत सिंघानिया लिखित ‘द इनकम्लिट मॅन’ या ऑटोबायोग्राफीत आपली यथेच्छ बदनामी करण्यात आली असून आपण तसेच आपल्या कुटुंबीयांना नाहक दूषणे देण्यात आलेली आहेत. त्यामुळे या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी, असे गौतम सिंघानियांचे म्हणणे होते. पुस्तक प्रसिद्ध झाल्यास समाजात आपली प्रतिष्ठा मलिन होण्याचा संभव आहे, असा आरोपही गौतम सिंघानिया यांनी केला होता. परंतु हे आरोप सिद्ध करणारे पुरावे ते न्यायालयात सादर करू शकले नाहीत. त्यामुळे आरोपांवर विश्वास ठेवता येणार नाही, असेही न्यायाधीश पोंक्षे म्हणाले.
































































