
सामना प्रतिनिधी । देवरुख
पोलीस फेडरेशनसाठी निधी मिळावा म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख आणि खेड अशा दोन पोलीस ठाण्यांच्या मोकळ्या जागेत लवकरच पेट्रोलपंप उभारले जाणार आहेत. या पंपाची संपूर्ण जबाबदारी पोलीस ठाण्यावर असणार आहे. जिल्ह्यातील या दोन्ही पोलीस ठाण्यांना पेट्रोलपंप मिळण्याची प्रक्रिया जलदगतीने सुरु असल्याची माहिती देवरुख पोलीस ठाण्याचे निरिक्षक शिवाजीराव पाटील यांनी दिली.
पोलीस फेडरेशनसाठी आजवर विविध नाटकांचे प्रयोग आणून निधी संकलनाचे काम करण्यात आले. यावर पोलीस यंत्रणेने राज्यातील पोलीस ठाणी आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या जागांचा उपयोग करुन पोलीस फेडरेशन आर्थिक दृष्टीने मजबूत व्हावे यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून यंत्रणेने धाडसी पाऊल उचलत राज्यातील पोलीस ठाण्यांकडे असलेल्या मोकळ्या जागेत पेट्रोल पंप उभारण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष पेट्रोल पंप उभारण्यात आले आहेत. यात सिधुदुर्ग जिल्ह्यातही अशाप्रकारे पेट्रोलपंप सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले. यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख आणि खेड पोलीस ठाण्याकडे पडिक आणि मुख्य शहरात तसेच मुख्य रस्त्यालगत मोकळ्या जागा उपलब्ध आहेत. या जागांचाही पेट्रोल पंपासाठी उपयोग होवू शकतो याची दखल जिल्हा पोलीस अधिक्षकांनी घेऊन याबाबतचे प्रस्ताव तयार केले आहेत. याला शासनाकडूनही मंजूरी मिळाली आहे. पोलीस यंत्रणेकडून यासाठीची पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामुळे देवरुख पोलीस परेड मैदानावर लवकरच पेट्रोल पंप सुरु होणार आहे. या पंपाच्या व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी देवरुख पोलीसांकडे असणार आहे. पंपातून मिळणारे उत्पन्न हे पोलीस फेडरेशनसाठी वर्ग होणार असल्याचेही शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.
































































