‘स्मार्ट ठाणे’चा श्वास गुदमरतोय! मिंधे सरकारविरुद्ध कारवाई करा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

ठाणेकरांची घुसमट करणारे वागळे इस्टेट डम्पिंग ग्राऊंड अन्यत्र हटवावे तसेच येथील कचऱयाचा प्रश्न ‘जैसे थे’ ठेवून पर्यावरण नियम धाब्यावर बसवणाऱया मिंधे सरकार, ठाणे पालिका व इतर प्रशासनाविरुद्ध कारवाईचे निर्देश द्या, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेत मिंधे सरकारला नोटीस बजावली आणि 21 जूनला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.

स्थानिक पर्यावरण कार्यकर्ते रामेश्वर बचाटे यांनी अॅड. विकास तांबवेकर आणि अॅड. राहुल मिश्रा यांच्यामार्फत ही रिट याचिका केली आहे. त्यावर न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठापुढे प्राथमिक सुनावणी झाली. वागळे इस्टेट डम्पिंग ग्राऊंडवर कचऱयाचे मोठे डोंगर उभे राहतात. या कचऱयापासून दुर्गंधी पसरून ठाणेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सरकारला वेळोवेळी निवेदन दिल्यानंतरही डम्पिंग ग्राऊंड दुसरीकडे हटवण्याबाबत कार्यवाही केलेली नाही, याकडे अॅड. तांबवेकर यांनी लक्ष वेधले. त्यावर खंडपीठाने मिंधे सरकार व ठाणे पालिकेसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावली.

– लोकवस्तीजवळच उघडय़ावर दिवस-रात्र कचऱयाचे मोठमोठे ढीग टाकले जातात आणि अधूनमधून कचरा जाळला जातो. त्यातून बाहेर पडणाऱया घातक प्रदूषणाचा नागरिकांसह पर्यावरणाला गंभीर धोका आहे. डम्पिंग ग्राऊंडपासून 30 ते 40 मीटरवर असलेल्या झोपडय़ांतील नागरिकांची एकप्रकारे छळवणूक सुरू आहे, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

प्रदूषण, पर्यावरणाच्या नियमांना केराची टोपली

कचऱयाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संरक्षणाच्या नियमांना केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे मिंधे सरकारसह ठाणे पालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण विभाग अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी, एमआयडीसीचे विभाग व्यवस्थापक यांच्यावर कारवाईचे निर्देश द्या, अशी विनंती याचिकेतून केली आहे.

महेंद्र कल्याणकर एसआरएचे सीईओ

– महेंद्र कल्याणकर यांना कोकण विभागीय आयुक्त पदावरून हटवून त्यांची बदली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव पी. वेलारासू यांची महिनाभरातच दुसऱयांदा उचलबांगडी करण्यात आली आहे. पेंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 23 मार्च रोजी वेलारासू यांना मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरून हटवून सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी त्यांची बदली केली गेली होती.

रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे रात्री करा!

– मुंबईतले दमट वातावरण तसेच वाहतूककाsंडी यासारख्या आव्हानांमुळे रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे ही रात्रीच्या वेळेत पूर्ण करा, अशी सूचना मुंबई आयआयटीने मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांना केली. पवईमधील मुंबई आयआयटीच्या कार्यालयात आयोजित विचारमंथन कार्यशाळेत महापालिकेच्या अभियंत्यांना अधिकाधिक मजबूत आणि टिकाऊ रस्ते बनवण्यासाठी आयआयटीतील अनुभवी प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले.