
>> प्रभाकर पवार
राज्य पोलीस दलात स्वच्छ प्रतिमा असलेले पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे फेब्रुवारीअखेरीस सहा महिन्यांच्या मुदतवाढीनंतर सेवानिवृत्त झाले. लोकसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांना आणखी तीन महिने मुदतवाढ मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले; परंतु ते फोल ठरले. त्यामुळे रिकाम्या झालेल्या पोलीस महासंचालकपदी मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जायसवाल यांची वर्णी लावण्यात आली तर गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या संजय बर्वे यांची मुंबईचे स्वातंत्र्यानंतरचे 42 वे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. निवृत्तीला सहा महिने शिल्लक असताना संजय बर्वे यांना न्याय मिळाला; परंतु त्यासाठीही त्यांना बराच संघर्ष करावा लागला. असो, येत्या ऑगस्टअखेरपर्यंत मुंबईची किमान कायदा आणि सुव्यवस्था तरी अबाधित राहील अशी अपेक्षा करूया.
मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी संजय बर्वे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संचालक होते. भ्रष्टाचाऱ्यांचे त्यांनी कंबरडे मोडले होते. मुंबई शहरातील देवनार, खेरवाडी क्राइम ब्रँच आदी पोलीस ठाण्यात तर संजय बर्वे यांच्या पथकाने सापळा रचून लाच घेणाऱ्या काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अलीकडे अटक केली होती. त्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना सुबोध कुमार जायसवाल यांनी सेवेतूनच बडतर्फ केले. त्यात एक पोलीस निरीक्षक व एक फौजदार होता. लाचप्रकरणी अटक झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात येते; परंतु बडतर्फ केल्याचे, खात्यातून हाकलून लावण्याचे उदाहरण नव्हते. जायसवाल यांनी मुंबईतील दोन अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला. तरीही लाच घेणे काही थांबले नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रार आल्यानंतर आपली कारवाई सुरूच ठेवली. तेव्हा मात्र मुंबईचे आयुक्त सुबोध कुमार जायसवाल यांचे अवसान गळाले. त्यांनी पोलीस ठाण्यातील सर्व वरिष्ठ निरीक्षक व निरीक्षकांच्या बैठका लावून त्यांना आवाहन केले. ते म्हणाले, ‘माणसाला जगायला किती पैसे लागतात! बरं, तुम्ही जमवलेली बेहिशेबी संपत्ती तुम्ही मेल्यावर वरती स्वर्गात घेऊन जाणार आहात का? इथे पृथ्वीवरच ती सोडून जाणार आहात ना? मग पैशाचा मोह ठेवून तुम्ही का अडचणीत येता? आपल्या कुटुंबीयांची तरी काळजी करा. तुम्हाला रंगेहाथ पकडल्यामुळे तुमची व तुमच्या कुटुंबीयांची अब्रू चव्हाटय़ावर येते. संपत्तीमध्ये पत्नीचा वाटा असेल, प्रॉपर्टी तिच्या नावावर असेल तर तुमच्याप्रमाणे तिलाही अटक होते. लाचखोर पती व त्यांच्या बायकांना न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याचीही उदाहरणे आहेत. तेव्हा लाच स्वीकारून किंवा मागणी करून पोलीस खात्याची बदनामी करू नका. खात्यासाठी व तुमच्या कुटुंबीयांसाठी तरी लाच मागणे सोडून द्या. असे अगदी कळकळीचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. त्यानंतर पोलीस आयुक्त सुबोध जायसवाल यांची बदली झाली. त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून संजय बर्वे या कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील भ्रष्टाचाराला आळा बसेल असे वाटते.
अलीकडे पोलीस दलात भरती होत असलेली तरुण पिढी भ्रष्टाचारात फारच आघाडीवर असल्याचे निरीक्षणास आले असून 108 क्रमांकाच्या बॅचचे सुमारे पाऊणशेच्या वर फौजदार लाच घेताना अलीकडे ‘ट्रप’ झालेले आहेत. ब्लॅकमेलर पत्रकार व खबऱ्यांच्या नादाला लागलेले पोलीस अधिकारी कुठेही कुणाकडेही पैशाची मागणी करतात आणि लाच घेताना रंगेहाथ पकडले जातात. अशा तरुण व नवीन अधिकाऱ्यांचे प्रबोधन करण्याची सध्या नितांत गरज आहे. लाचखोर पोलीस पकडले जातात हे जरी खरे असले तरी पोलीस खात्याचीही अवस्था फारच दयनीय आहे. मध्यंतरी ऍण्टी करप्शनच्या ट्रपचा एक ‘एसएमएस’ वाचनात आला. पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या एका फौजदाराला 10 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली असल्याचा तो मॅसेज होता. ऍण्टी करप्शनने रितसर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट म्हटले आहे. ट्रप झालेल्या फौजदाराकडे आरोपीला बाहेरगावी जाऊन आणण्यासाठी (प्रवासाला) पैसे नव्हते. तपास करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने एका व्यावसायिकाकडे त्या फौजदाराने 20 हजारांची लाच मागितली होती. परंतु त्या व्यावसायिकाची इच्छा नसल्याने त्याने ऍण्टी करप्शनकडे धाव घेऊन त्या फौजदाराला रंगेहाथ पकडून ऍण्टी करप्शनच्या ताब्यात दिले.
ट्रपमागील खऱ्या कारणांची अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आज पोलिसांना पोलीस ठाण्यात कोणत्याही सुविधा नाहीत. आज पोलीस ठाण्यात कागद मात्र वाढले आहेत. रोज शेकडो झेरॉक्सच्या प्रती काढाव्या लागतात. एका चार्जशीटसाठी किमान 500 रुपये खर्च येतो. बेवारस प्रेत उचलायचे असेल आणि शववाहिनीतून त्याची ने-आण करायची असेल तर प्रत्येकी 2 ते 3 हजार रुपये खर्च येतो. हरवलेल्या व्यक्तींचा, मुलींचा शोध घेण्यासाठीही कधी कधी सरकारी वाहने उपलब्ध नसतात (असली तरी कुचकामी) तेव्हा पोलिसांना खासगी वाहनांचा खर्च करावा लागतो. परप्रांतातील आरोपींचा शोध घेताना व त्यांची ने-आण करतानाही पोलिसांना स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागतात, त्यामुळे आज भ्रष्टाचार वाढत आहे. अशी भ्रष्टाचारामागची बरीच कारणे आहेत. म्हणून काही भ्रष्टाचाराचे समर्थन करता येणार नाही. पोलिसांना नाईलाज म्हणून कुणाकडे पैसे मागावे लागत असतील तर त्यात शासनाचाही दोष आहे. नवीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी पोलिसांमधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी काही उपाययोजना केल्यास त्यांची कारकीर्द सार्थकी ठरेल इतकेच! सध्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल यांना मुंबई पोलिसांमधील वाढत्या भ्रष्टाचारावर बोलताना ‘‘तुमच्या कुटुंबियांचा, पोराबाळांचा तरी विचार करा’’ असे जेव्हा कळकळीचे आवाहन करावे लागते तेव्हा भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे हे दिसून येते.






























































