T20 WC कपिल देव यांचा विराटसेनेवर गंभीर आरोप, BBCI कडे केली ‘ही’ मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूएईमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकामध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला यजमान हिंदुस्थानचा संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. यामुळे नेटकरी आयपीएलला टार्गेट करत आहेत. त्यामुळे देश की आयपीएल? असा प्रश्न उभा ठाकला आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानचे माजी कर्णधार कपिल देव यांनी टी-20 विश्वचषक खेळणाऱ्या खेळाडूंवर निशाणा साधला आहे.

‘एबीपी न्यूज’शी बोलताना कपिल देव म्हणाले की, टी-20 विश्वचषकामध्ये जे घडले ते विसरून आता पुढील विश्वचषकावर लक्ष केंद्रीय करण्याची आवश्यकता आहे. पुढील विश्वचषकाच्या आयोजनाला जास्त वेळ उरलेला नाही. त्यामुळे हिंदुस्थानच्या संघाने आता तयारी करून पुढची योजना आखावी. तसेच आपल्या खेळाडूंना एक्स्पोजर मिळत आहे, परंतु ते त्याचा पुरेपूर वापर करू शकत नाही.

काही खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करण्याऐवजी आयपीएलचा प्राधान्य देत आहेत. बीसीसीआयने याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. खेळाडूंनी फ्रेंचाईजींसाठी क्रिकेट खेळू नये असे मला म्हणायचे नाही, परंतु त्यांनी प्राधान्यक्रम ठरवायला हवा, असेही कपिल देव म्हणाले. तसेच खेळाडू देशापेक्षा आयपीएलला प्राधान्य देतात तेव्हा त्यावर आपण काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. परंतु आपल्या देशासाठी खेळताना खेळाडूंना गर्व वाटायला हवा. मला त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत माहिती नाही त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. परंतु आधी देश आणि मग फ्रेंचाईजी असे नक्कीच सांगेन. तसेच क्रिकेटचे योग्य नियोजन करण्याची जबाबदारी बीसीसीआयची आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, आयपीएलच्या उर्वरित सत्राचे आयोजन टी-20 विश्वचषकाच्या तोंडावरच करण्यात आले होते. विश्वचषकाचे सराव सामने सुरू झाले तेव्हाही आयपीएलचे सामने सुरू होते. व्यस्त कार्यक्रमामुळे हिंदुस्थानच्या संघांला हवा तसा आराम मिळाला नाही. विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभूत झालेल्या संघाला अखेर आपला गाशा गुंडाळावा लागला.