अहंकाराची मान झुकली, कृषी कायद्यांच्या निर्णयानंतर राहुल गांधीचीं पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकरी आंदोलनाच्या एक वर्षानंतर अखेर केंद्रातील मोदी सरकारने माघार घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सोबतच पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. ‘देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रह करत अंहकाराची मान झुकवली आहे. अन्यायाविरोधातील या विजयाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय हिंद का किसान!’

राहुल गांधी यांनी आपला एक जुना व्हिडीओ सुद्धा ट्विट केला आहे. Mark my words, the Govt will have to take back the anti-farm laws. (मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे. पंजाबमधील माझ्या दौऱ्यावेळी मी हे मुद्दे उचलले आहेत. माझे शब्द नोंदवून ठेवा. सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागतीलच. मी काय म्हणालो हे लक्षात ठेवा.)

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे की, ‘काळे कायदे रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे. शेतकरी मोर्चाच्या सत्याग्रहास ऐतिहासिक यश मिळाले आहे. बलिदानामुळेच हे शक्य झालं आहे. आता पंजाब सरकारने शेतीला पुनरुज्जीवन देण्यास प्राधान्य दिले पाहिजे.’

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आज प्रकाश दिवसाच्या पवित्र दिवशी आनंदाची बातमी मिळाली आहे. तीन कृषी कायदे रद्द झाले आहेत. 700 हून अधिक शेतकरी शहीद झाले. त्याचे बलिदान कायम लक्षात राहील. येणारी पिढी लक्षात ठेवेल की शेतकऱ्यांनी बलिदान करत शेती आणि शेतकऱ्यांना वाचवलं होतं. माझ्या देशातील शेतकऱ्यांना माझा नमस्कार.’