भाजपला मतदान म्हणजे महाराष्ट्रातील कारखाने गुजरातला पळवण्याचे लायसन्स; प्रकाश आंबेडकर यांचे मोदी सरकारला तडाखे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान कमी आणि गुजरातचे पंतप्रधान जास्त आहेत. अमेरिका, जपान, फ्रान्सचे राष्ट्रप्रमुख आले की त्यांना गुजरातला नेले जाते. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील उद्योग मोठय़ा संख्येने गुजरातला नेण्यात आले आहेत. आता जर आपण पुन्हा भाजपला मतदान केले तर महाराष्ट्रातील कारखाने गुजरातला पळवण्याचे लायसन्स दिल्यासारखेच होईल, असे जोरदार तडाखे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला लगावले.

नेरुळ येथील सेक्टर 12 मधील श्रीगणेश रामलीला मैदानावर वंचित बहुजन आघाडीचा मेळावा आज सायंकाळी पार पडला. या वेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशाची वाटचाल सध्या हुकूमशाहीच्या दिशेने सुरू झाली आहे. 1950 ते 2014 या 75 वर्षांच्या कालखंडात फक्त सात हजार 200 कुटुंबे देश सोडून गेली होती. पण 2014 ते 2024 या दहा वर्षांच्या कालावधीत तब्बल 24 लाख कुटुंबांनी आपला देश सोडून दुसऱया देशाचे नागरित्व पत्करले आहे. जे गेले ते खुशीने नाही तर मजबुरीने गेले आहेत असे आंबेडकर म्हणाले. याप्रंसगी रेखा ठाकूर, नीलेश विश्वकर्मा, प्रियदर्शी तेलंग, शिल्पा रणदिवे आदी उपस्थित होते.

ना खाने दुंगा… सब कुछ अकेलाही खाते रहुंगा
मोदी सरकारच्या कारभाराचा पंचनामा करताना अॅड. आंबेडकर पुढे म्हणाले, सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ना खाऊंगा ना खाने दुंगा’ अशी घोषणा केली होती. मात्र आता त्या घोषणेचे रूपांतर मै ना खाने दुंगा, सब कुछ अकेलाही खाते रहुंगा असे झाले आहे असा टोलात्यांनी लगावला.