इंग्लंड स्थानिक एकदिवसीय चषकमध्ये केला पराक्रम, पृथ्वी शॉचा द्विशतकी धमाका

हिंदुस्थानचा धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉने काऊंटी क्रिकेटमध्ये बुधवारी द्विशतकी धमाका केला. त्याने नॉर्दहॅम्पटनशायर संघाकडून खेळताना इंग्लंड स्थानिक एकदिवसीय चषक स्पर्धेत 41 षटकांत 129 चेंडूंत 24 चौकार व 8 षटकारांसह द्विशतकी खेळी साजरी केली. समरसेट संघाच्या गोलंदाजांची धुलाई करणारा पृथ्वी शॉ 153 चेंडूंत 28 चौकार व 11 षटकार ठाकून 244 धावसंख्येवर बाद झाला.

आयपीएल 2022मध्ये लक्षवेधी कामगिरी करणारा पृथ्वी शॉ आयपीएलच्या 2023 च्या सत्रात अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्यावर चोहोकडून टीकेची झोड उडाली होती. मॉडेल सपना गिलसोबत भररस्त्यावर झालेल्या वादात पृथ्वी शॉ निर्दोष ठरला असला तरी तो टीकेचा धनी ठरला होता. त्यामुळे कामगिरी उंचावण्यासाठी त्याच्यावर कमालीचे मानसिक दडपण होते. मात्र बुधवारचा दिवस खऱया अर्थाने पृथ्वी शॉचा होता. सलामीला आलेल्या नॉर्दहॅम्पटनशायरच्या या फलंदाजांना आल्याआल्या समरसेट संघाच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. पृथ्वी व एमिलियो गे यांनी 10.3 षटकांत 63 धावांची सलामी दिली. एमिलियो बाद झाल्यानंतर पृथ्वी अधिक आक्रमक झाला. त्याच्या 244 धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर नॉर्दहॅम्पटनशायर संघाने 8 बाद 415 धावांचा डोंगर उभारला. अखेरचे तीन चेंडू शिल्लक असताना पृथ्वी बाद झाला. डॅनी लॅम्पने थॉमसकरवी झेलबाद करून पृथ्वीचा झंझावात थांबविला.

लिस्ट ‘‘ए’मध्ये दुसरे द्विशतक

या स्पर्धेतील पहिल्या दोन लढतींत पृथ्वी शॉला फारशी करामत करता आली नव्हती. गुलस्टरशायरविरुद्धच्या पहिल्या लढतीत तो 34 धावांवर असताना दुर्दैवाने हिट विकेट बाद झाला होता. ससेक्सविरुद्धच्या दुसऱया लढतीतही त्याला केवळ 26 धावा करता आल्या होत्या, मात्र समरसेटविरुद्ध द्विशतक साजरे करून पृथ्वी शॉने पुन्हा एकदा आपली दखल घ्यायला भाग पाडले. लिस्ट ‘ए’मधील त्याचे हे दुसरे द्विशतक होय. याआधी विजय हजारे ट्रॉफीत मुंबईच्या पृथ्वीने पुद्दुचेरीविरुद्ध 152 चेंडूंत 227 धावांची खेळी केली होती.