
सामना प्रतिनिधी । जालना
संभाजी भिडे गुरुजी यांच्या बैठकीला विरोध करणाऱ्या भारिप बहुजन महासंघ आणि संभाजी बिग्रेडच्या 35 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी हे 27 जानेवारी रोजी होणाऱ्या गडकोटी मोहिम आणि शिवछत्रपतींचे 32 मन सुवर्ण सिंहासन निधी संकलन यासाठी जालन्यात आले होते. त्यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमादरम्यान बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भारिप बहुजन महासंघ व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची घोषणबाजी सुरु होताच पोलिसांनी लाठीचार्ज करुन कार्यकर्त्यांना पांगवले व 30 ते 35 जणांना ताब्यात घेतले.
गेल्या आठ दिवसांपासून संभाजी भिडे गुरुजी यांच्या दौऱ्याबद्दल सोशल मीडियातून चर्चा झाली होती. अनेकांनी त्यांचा दौरा व्हायरल करुन या कार्यक्रमाला विरोध दर्शविला होता.

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचे शहरातील एका हिंदी विद्यालय व्याख्यान आयोजित आयोजित करण्यात आले होते. याच ठिकाणी भारिप बहुजन महासंघ व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करुन 30 ते 35 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. संभाजी भिडे पोलीस संरक्षणात संभाजीनगरकडे रवाना होत असताना त्यांना काळे झेंडेही दाखविण्यात आले आहे.
































































