गजा मारणे टोळीतील आणखी एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी मोक्कानुसार कारवाई केलेल्या कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील आणखी एकाला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने नऱ्हे परिसरातून अटक केली आहे. त्यामुळे मोक्कानुसार कारवाई केलेल्या मारणे टोळीचे धाबे दणाणले आहेत.

मयूर राजेंद्र निवंगुणे (रा. नवले ब्रिजजवळ, नऱ्हे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. व्यावसायिकाच्या अपहरणातील मोक्कातील फरारी नऱ्हे परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सुमित ताकपेरे यांना मिळाली. पथकाने नऱ्हे परिसरात सापळा रचून मयूर निवंगुणे याला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, एपीआय नरेंद्र पाटील, शाहीद शेख, निलेश शिवतरे, सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, ऋषिकेश कोळप, तेजाराणी डोंगरे यांनी केली.