
अमेरिकेतील अंतराळ संशोधन ‘नासा’च्या नावाने अनेकांना तब्बल सहा कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘राइस पुलर’ यंत्राच्या विक्रीतून चांगला परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
राम गायकवाड (रा. अकलूज, जि. सोलापूर), रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ, राहुल जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखळ करण्यात आला आहे. याबाबत बाबासाहेब नरहरी सोनवणे (वय – 50, रा. शिवपार्वती सोसायटी, सातववाडीजवळ, गोंधळेनगर, हडपसर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राईस पूलर यंत्राला मागणी असून यंत्राच्या खरेदीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे आमिष आरोपींनी दाखविले होते. स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये आरोपींनी गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’तील प्रतिनिधी हिंदुस्थानात येणार आहेत. ‘नासा’चे शास्त्रज्ञ या यंत्राचे परीक्षण करणार असून राइस पूलर यंत्रावर ते संशोधन करणार आहेत. राइस पूलर या धातुच्या भांड्याला मागणी असल्याचे आरोपींनी गुंतवणूकदारांना सांगितले होते. बनावट कागदपत्रांद्वारे आरोपींनी नागरिकांकडून पैसे गोळा केले.
दरम्यान, पोलिसांकडे या प्रकरणात फसवणूक झालेल्या 100 नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिले होते. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































