
शहरात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असून विविध प्रकाराचे आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली जात आहे. सीमकार्ड अपग्रेड करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने महिलेला 2 लाख 25 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना कोथरुडमधील डहाणूकर कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी नम्रता काटकर (वय – 39, रा. कोथरुड) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला नम्रता डहाणूकर कॉलनीत राहाण्यास आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांना आयडिया कंपनीतून बोलत असल्याचा फोन आला होता. त्यानुसार संबंधिताने नम्रता यांना सीमकार्ड अपग्रेड करण्यास सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्याने नम्रता यांना अॅप डाउनलोड करण्यास सांगून बँकेची गोपनीय माहिती चोरली. त्यांच्या बँकखात्यातून 2 लाख 25 हजार रुपये वर्ग करुन सायबर चोरट्याने फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेश तटकरे अधिक तपास करीत आहेत.




























































