
सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी रसिकांनी प्रचंड गर्दी केली. दुपारी 12 वाजता सत्राला सुरुवात झाली. मंडपाच्या मागील बाजूस असलेल्या पडद्यावर विजेच्या तारा तुटून पडल्याने तेथील कापडाने पेट घेतला. अग्निशमन दलाचे कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि स्वयंसेवक यांच्या तत्परतेमुळे आगीवर लगेच नियंत्रण मिळविण्यात यश आले, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवादरम्यान रविवारी दुपारी चार वाजता कार्यक्रमस्थळी असणाऱया जनरेटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन मंडपामधील कापडाने पेट घेतला. तिथेच उपस्थित असलेले नागरिक केदार केळकर यांनी अग्निरोधक उपकरणाचा (फायर एक्स्टिंग्युशर) वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच वेळी घटनास्थळी बंदोबस्तावर तैनात असलेली अग्निशमन दलाची फायर गाडी व जवान यांनी तातडीने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमध्ये मंडपाच्या ठिकाणी असलेले कापड जळाले असून इतर कोठेही आग पसरली नाही. बंदोबस्तावर तैनात असलेले अग्निशमन दलाचे वाहनचालक बिजू वाघमारे व जवान संदीप घडशी, रवी बारटक्के, ज्ञानल तारू, अक्षय चव्हाण यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.




























































