विनामास्क कारवाईच्या रागातून पोलिसाला मारहाण, नाना पेठेतील घटना; दोघांना अटक

विनामास्क दुकानात बसलेल्याविरुद्ध कारवाई करताना रागातून तिघांनी एका पोलिस शिपायाला मारहाण केल्याची घटना काल संध्याकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास नानापेठेत घडली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोघांना अटक केले आहे. रितेश नंदकुमार कासट (43) आणि कृष्णा मल्लप्पा अंतरगंगी (25) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्याचा साथीदार अक्षय सुरेश बेगरुट (वय -27, सर्व रा. नाना पेठ) फरार आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई विजय भोसले यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी विजय नाना पेठेतील पालखी विठोबा चौकाजवळ पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी रितेश मयंक एन्टरप्रायजेस दुकानाच्या काउंटरवर विनामास्क बसला होता. त्यामुळे विजय त्याच्याविरुद्ध विनामास्कची कारवाई करीत होते. त्यावेळी तेथे असलेल्या कृष्णा आणि अक्षयने विजयला पकडून हाताने मारहाण केली. त्यांच्या गणवेशाची नेमप्लेट तोडून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी समर्थ पोलिस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या