
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
2012 मध्ये पुण्यातील स्वारगेट येथून एसटीबस पळवून त्या एसटीने 9 जणांना चिरडणाऱ्या संतोष मानेला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने संतोष मानेची फाशी रद्द करत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
नऊ लोकांच्या बळीस कारणीभूत ठरलेला महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाचा बडतर्फ चालक संतोष माने याला पुण्यातील सत्र न्यायालयाने एप्रिल 2013 साली फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला संतोष मानेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत शिक्षा कमी करण्यासाठी अपील दाखल केले होते. या अपिलावर बुधवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मानेची फाशीची शिक्षा कमी करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
कधी घडली होती घटना?
25 जानेवारी 2012रोजी स्वारगेट एसटी बस स्थानकातून बस पळवून नेली आणि भर रस्त्यात बेफाम चालवली. त्यात त्याने 45 पेक्षा जास्त वाहनांना धडक दिली. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर 37 जण जखमी झाले होते.

































































