
कोरोनानंतरही चिकनचा भाव वाढविला नसल्याच्या रागातून एका चिकन विक्रेत्याच्या दुकानाची सत्तूराने मोडतोड करीत कामगारांना धमकी दिली. याप्रकरणी संबंधिताला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली. ही घटना काल संध्याकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास औंध येथील कस्तुरबा वसाहतीत घडली.
रफिक सलीम शेख (वय 38, रा कस्तुरबा ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी योगेश बोकडे (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध परिसरात रफिक चिकन विक्रेता आहे. कोरोनामुळे व्यवसायात मंदी आल्यामुळे रफिकने योगेशच्या मालकाला चिकनचे भाव वाढविण्यास सांगितले होते. मात्र, तरीही त्याने चिकनचे भाव वाढविले नसल्यामुळे रफिकला राग आला. त्यामुळे काल संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास रफिकने तेथे येउन दुकानाच्या काचा, पंख्याची तोडफोड केली. त्यानंतर कामगारांना मध्ये पडण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे तपास करीत आहेत.


























































