
पुणे शहरातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मास्टरप्लॅन तयार केला आहे. त्यानुसार संबंधित वाहतूक विभाग प्रमुखाला आता दर तासाला सेल्फी फोटो घेऊन माय सेफ पुणे अॅपवर अपलोड करावा लागणार आहे. त्या शिवाय हद्दीतील वाहतूक स्थितीचेही वेळोवेळी अपडेट ग्रुपवर द्यावे लागणार आहे. चलान दंडवसुलीऐवजी वाहतूक नियमनाला प्राधान्य देण्याचे आदेशही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले आहेत.
वाहतूक नियमन करण्यासाठी वाहतूक अमलदारांसह अधिकाऱ्यांनी 12 तास ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याशिवाय पुणे पोलिसांच्या माय सेफ पुणे अॅपमध्ये दर तासाला चौकात हजर असलेला सेल्फी अपलोड करावा लागणार आहे. मुख्य चौकात दर तासाला गर्दीचे अपडेट, परिसरातील वाहतूक नियमन कसे सुरू आहे, रस्त्यावर पथारीवाले येणार नाही, वाहतूक नियमभंग कोणी करणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे. वाहतूक अमलदारांसह अधिकाऱ्यांनी वेळोवेळी रस्त्यावरील वाहनांच्या वर्दळीचा अंदाज घेउन सिग्नल यंत्रणा कार्यन्वित ठेवावी. कर्मचाऱ्यांना ई-चलान दंड वसुलीऐवजी वाहतूक नियमाला प्राधान्य देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता पीक अवर्समध्ये ड्युटीवर अमलदारांना दक्ष राहावे लागणार आहे.
आधी वाहतूक नियमन, मग इ-चलान दंडवसुली
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अमलदारासोबत विभाग प्रमुखालाही काम करावे लागणार आहे. मात्र, ई-चलान दंडवसुली करण्यास प्राधान्य न देता, वाहतूक नियमाला गती देण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्याशिवाय चौकात वाहनांची गर्दी होणार नाही, अवजड वाहने मध्यवर्ती शहरात येणार नाही याची दक्षता अमलदारांना घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. अमलदारापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कामकाजाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. गर्दीचे चौक, सर्वाधिक वाहनांची संख्या असलेल्या चौकातील आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार प्लॅनिंग करून वाहतूक नियमनाला प्राधान्य दिले आहे. दरम्यान, आता दिवाळीमुळे गावी गेलेल्या चाकरमान्यामुळे रस्त्यावर वाहने कमी आहेत. मात्र, तरीही वाहतूक अमदारांसह अधिकाऱ्यांनी ड्युटीवर दक्ष राहण्याचे सूचित केले आहे.
– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर





























































