
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर महिन्याभरानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी अधिकृतपणे काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणाही केली आहे. अमरिंदर सिंग (७९) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सात पानी राजीनामा पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे. तसेच पंजाबबाबत पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयांबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे.
कॅप्टन अमरिंदर यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या सात पानी पत्रात नवज्योतसिंह सिद्धू यांना पंजाब काँग्रेस अध्यक्ष बनवण्याच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या या निर्णयामुळे नंतर त्यांना पश्चात्ताप होईल, असेही सिंग यांनी म्हटले आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदी असताना आपण केलेल्या कार्याचा लेखाजोखाही सिंग यांनी या पत्रात मांडला आहे.
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नव्या पक्षाचे नाव पंजाब लोक काँग्रेस असे ठेवले आहे. पक्षाच्या नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केल्याचेही त्यांनी सांगितले. आपण पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा याआधीच केली होती. त्याप्रमाणे आपण नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे.
पंजाब लोक काँग्रेस असे पक्षाचे नाव ठेवण्यावर निवडणूक आयोगाने कोणताही आक्षेप घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचे चिन्ह अद्याप ठरले नसून निवडणूक आयोगाकडे तीन चिन्ह्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी एक निश्चित करण्यात येणार आहे. तसेच पक्षाची औपचारिक सुरुवात झाल्यानंतर पक्षाचे धोरण, रणनीती, दृष्टीकोन, ध्येय याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.




























































