
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्यानंतर रविवारी रात्रीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची घरी जाऊन भेट घेतली व विचारपूस केली. त्यावर प्रदीप पूर्णेकर यांचा पुत्र राम याने समाज माध्यमात पोस्ट करून संताप व्यक्त केला.
टायगर श्रॉफची विचारपूस करायला एकनाथ शिंदे लगेच त्याच्या घरी पोहचले. हल्लेखोरांवर कठोर कारवाईचे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र ठाण्यात घराजवळ असलेल्या प्रदीप पूर्णेकर यांची हत्या होऊन 19 दिवस झाले तरी त्यांच्या घरी यायला, त्यांच्या कुटुंबाला भेटायला शिंदे यांना वेळ नाही. याला म्हणतात ‘शिवसेना मीनाक्षी राजा पर्व’, अशी खरमरीत पोस्ट राम याने इन्स्टाग्रामवर केली आहे.
एका अभिनेत्याच्या कारवर गोळीबार करण्यात आला. त्या हल्लेखोरांना 12 तासांच्या आत अटक करण्यात आली. तपासासाठी 15 पथके बनवली. मात्र दुसरीकडे ठाण्याचे पोलीस पंधरवडा होऊन गेला तरी पूर्णेकर यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधारांवर काहीच कारवाई करत नाहीत. हा भेदभाव आणि अन्याय नाही का, असा संतप्त सवाल राम पूर्णेकरने माध्यमांशी बोलताना केला. न्यायासाठी मी एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आंदोलन करणार, असेही राम याने पुन्हा एकदा सांगितले.































































