
सामना ऑनलाईन । कलबुर्गी
राफेलच्या घोटाळय़ात ‘पकडले’ गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता अख्ख्या देशालाच ‘चौकीदार’ बनवायला निघाले आहेत, अशी तोफ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मोदी यांच्यावर येथे डागली. राफेल सौद्यातील चोरी पकडली जाण्यापूर्वी उभा हिंदुस्थान चौकीदार कधीच नव्हता, असा टोलाही त्यांनी लगावला. ते कुलबर्गी येथील सभेत बोलत होते.
मोदी यांनी चौकीदारी तरी कोणाची केली? त्यांनी अनिल अंबानी, मेहुल चौक्सी, नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या यांच्यासाठी चौकीदारी केली नाही काय, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
पुलवामात आत्मघातकी बॉम्बरने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान ज्या दिवशी शहीद होतात त्याचदिवशी पंतप्रधान मोदी हे सहा विमानतळे गौतम अदानी या उद्योगपतीला बहाल करतात, असे त्यांनी सांगितले. मला पंतप्रधान नव्हे देशाचा ‘चौकीदार’ बनवा, असे मोदी हे मागील लोकसभा निवडणुकीवेळी सांगायचे. पण सत्तेवर येताच ते धनदांडग्यांचे ‘चौकीदार’ बनलेत असे राहुल गांधी म्हणाले. मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा जशा बदलल्या, तसे ते देशाचे संविधानही बदलू मागत आहेत, संपवू पाहात आहेत, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांचे हे मनसुबे काँग्रेस कदापि पूर्ण होऊ देणार नाही. काँग्रेसने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले आहे, असे सांगतानाच चौकीदार फक्त चोरीच करत नाही तर खोटी आश्वासनेही देत असतो, असा हल्ला त्यांनी चढवला.





























































