राहुरीच्या बाजारात शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीला चांगला प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या आठवडे बाजारात शेळी, बोकड, मेंढी, कोंबडय़ांच्या खरेदी-विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, बाजारभावात मंदी असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 29 आठवडे राहुरीत भरणारा गुरुवारचा आठवडे बाजार बंद होता. गेल्या आठवडय़ापासून राहुरीतील गुरुवारचा आठवडे बाजार सुरू झाला आहे. गेल्या गुरुवारच्या तुलनेत यंदा जनावरांच्या आठवडे बाजारात खरेदीदार व्यापारी व शेतकऱ्यांची उपस्थिती चांगली होती. लॉकडाऊनच्या काळात राहुरी तालुक्यातील शेतमालाची मातीमोल भावाने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. दिवाळी जवळ आल्याने आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आठवडे बाजारात शेतकऱ्यांनी पाळीव जनावरे विक्रीसाठी बाजारात आणली होती. मात्र, बाजारात विक्रीसाठी आलेल्या कोंबड्या, शेळी, बोकड, मेंढ्याला अपेक्षित बाजारभाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.

राहुरीत भरणाऱ्या जनावरे खरेदी-विक्री बाजारात राहुरी, नगर, नेवासा, संगमनेर, श्रीरामपूर भागातील व्यापारी खरेदीसाठी येत असल्याने खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मोठी उलाढाल होत आहे.