मोदी एक्सप्रेस राज्यसभेतही घसरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्सप्रेस घसरल्याचे पाहायला मिळाले. सलग दुसऱया दिवशी काँग्रेसला लक्ष्य करताना पंतप्रधानांनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस नसती तऱ… पाढा वाचत टीका केली. आणीबाणी लागू करण्यापासून ते राज्य सरकारे बरखास्त करण्यापर्यंतचे संदर्भ दिले. यावेळी राज्यसभेत गोंधळ उडाला. काँग्रेस खासदारांनी घोषणा देत सभात्याग केला. दरम्यान, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डोळय़ासमोर ठेवून पंतप्रधानांनी संसदेतच प्रचाराचे भाषण केले सोमवारी पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडबाबत विधाने केली, आज त्यांनी ‘गोवा’ आणले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुळे देशात कोरोना वाढला असा आरोप केला होता. आज राज्यसभेतही आपल्या 90 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा काँग्रेस, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. पंतप्रधानांचा आवेश यावेळी निवडणूक प्रचारसभेतील भाषणासारखा होता.

पंतप्रधान काय म्हणाले?

  • देशाच्या विकासाचा पाया काँग्रेसने रचला आणि भाजपने येऊन आपला झेंडा लावला, अशी टीका सभागृहात केली गेली. हे गंभीर वक्तव्य आहे. काहींना अजूनही वाटते हिंदुस्थानचा जन्म 1947 ला झाला. या विचारसरणीमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. देशातील लोकशाही तुमच्या (काँग्रेस) मेहरबानीने नाही. 1975 मध्ये लोकशाहीचा गळा घोटणाऱया काँग्रेसला यावर दावा करण्याचा अधिकार नाही.
  • महात्मा गांधीजींची इच्छा होती स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जित करावी. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस नसती तर काय झाले असते? हे मी आता सांगतो. काँग्रेस नसती तर देशातील लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त असती, देश स्वदेशी संकल्पनेच्या मार्गावर चालला असता, काँग्रेस नसती तर आणीबाणी लादली गेली नसती, काँग्रेस नसती तर भ्रष्टाचाराला अभय मिळाला नसता. जातीवाद, क्षेत्रवादाची दरी मोठी झाली नसती. काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता, पंजाब अतिरेक्यांच्या आगीत होरपळला नसता, पंडितांवर कश्मीर सोडण्याची वेळ आली नसती. काँग्रेस नसती तर तंदुरमध्ये मुलींना जिवंत जाळण्यात आले नसते.
  • काँग्रेस हायकमांडचे त्रिसूत्री धोरण राहिले आहे. अविश्वास निर्माण करा, अस्थिर करा आणि बरखास्त करा.
  • केंद्रात अनेक दशके सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने शंभरवेळा राष्ट्रपती शासन लागू करून राज्य सरकारे बरखास्त केली. डॉ. फारुख अब्दुल्ला, चौधरी देवीलाल, चौधरी चरणसिंह यांचे सरकार कोणी अस्थिर केले होते? पंजाबमध्ये बादल सरकार, कर्नाटकात रामकृष्ण हेगडे आणि एस. आर. बोम्मई सरकार, तामीळनाडूत करुणानिधी, एमजीआर यांचे सरकार, आंध्र प्रदेशात एनटीआर सरकार कोणी बरखास्त केले होते?
  • काँग्रेसने आपल्या नेत्यांनाही सोडले नाही. सीताराम केसरी यांच्याबाबत काय केले हे आम्हाला माहीत आहे.
  • कोरोना काळात 23 वेळा मी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठका घेतल्या. सर्वपक्षीय बैठक बोलावली तेव्हा या बैठकीला कोणी जाऊ नये असे प्रयत्न झाले. काँग्रेस नेतृत्वाने आडमुठी भूमिका घेतली. मात्र कोरोना संकट हे मानवजातीवरचे संकट आहे हे समजून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय औदार्य दाखवले. शरद पवार यांचे मी आभार मानतो. तृणमूल काँग्रेसनेही समंजस भूमिका घेतली, मात्र काँग्रेस नेते साधे बैठकीलाही फिरकले नाहीत.

हृदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणी नोकरीतून काढले होते

पंतप्रधान मोदी यांनी भाषणात गोवा विधानसभा निवडणुकीची पूर्ण काळजी घेतल्याचे पाहायला मिळाले. लता मंगेशकर यांच्या निधनाने देश दुःखी आहे. लता मंगेशकर यांचे कुटुंब गोव्यातील आहे. लता मंगेशकर यांचे लहान भाऊ पंडित हृदयनाथ मंगेशकर हे आकाशवाणीवर नोकरीला होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गीत सादर केले. त्यामुळे हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरून काढण्यात आले होते. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटणारी मंडळीच (काँग्रेस) आज अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने गळा काढत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

काँग्रेसमुळे गोव्याला उशिरा स्वातंत्र्य मिळाले

देश स्वतंत्र झाल्यानंतर 15 वर्षांनी गोवा मुक्त झाला. सरदार पटेल यांनी हैदराबाद, जुनागढसाठी रणनीती बनविली. त्यातून प्रेरणा घेतली असती तर गोव्याला 15 वर्षे गुलामगिरीत राहावे लागले नसते, असे सांगताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि पंडित नेहरूंवर टीका केली. आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्याची चिंता नेहरूंना होती. त्यामुळे गोव्यात लष्कर पाठविले नाही. गोव्याबाबत काँग्रेसने अन्याय केला. गोव्याला 15 वर्षे पारतंत्र्यात ठेवले, असा आरोपही पंतप्रधानांनी केला.