
अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्यासह अनेक आमदारांनी महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये न जाता भाजपमध्ये यावे असा राज्य गुप्तवार्ता विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांचा प्रयत्न होता. त्यासाठी रश्मी शुक्ला यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पैशाची ऑफरही दिली, असा गंभीर आरोप गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
महाविकास आघाडीत न जाण्यासाठी केलेले फोन, फोन टॅपिंग प्रकरण व आताचा गदारोळ हे सर्व पाहिले तर हा कटाचा भाग होता, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते म्हणाले की, अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकरच नव्हे तर अनेक आमदारांनी महाराष्ट्र विकास आघाडीत न येता भाजपमध्ये प्रवेश करावा असा रश्मी शुक्ला यांचा प्रयत्न होता. त्यांनी केलेले फोन टॅपिंग व आताचा गदारोळ हा एक हे सर्व पाहिले तर रश्मी शुक्ला कोणासाठी काम करीत होत्या हे महाराष्ट्राला सांगायला नको असे त्यांनी भाजपचे नाव न घेता सांगितले.
हो मला ऑफर होती
भाजपसोबत येण्याची मला ऑफर देण्यात आली होती. राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याशी निगडित व्यक्तीद्वारे मला भाजपला पाठिंबा देण्याबाबत विचारणा झाली होती. यासंदर्भात रश्मी शुक्ला यांच्या माणसाने फोनवर संभाषण करून दिले होते, असे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी स्पष्ट केले. मी अपक्ष म्हणून निवडून आल्याने भाजप पाठिंब्यासाठी विचारणा झाल्यानंतर मी माझ्या मतदार संघातील कार्यकर्ते आणि जनतेचा मेळावा घेतला आणि महाविकास आघाडीसोबत जायचा निर्णय घेतला.






























































