
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
रत्नागिरी एमआयडीसीत उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्र महाराष्ट्र औद्योगिक विकास मंहामंडळ केंद्राला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील औद्योगिक क्रांती घडवितानाच औद्योगिक क्षेत्रात असणार्या कारखान्यात कोणताही अपघात घडल्यास त्यासाठी अग्निशमन यंत्रणा सुसज्ज रहावी यासाठी सुमारे सव्वाचार कोटी रुपये खर्च करून अग्निशमन केंद्र तसेच कर्मचार्यांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. गेली दोन वर्षे हे काम प्रलंबित असून त्याचे उद्घाटन झालेले नसल्याने हे उद्घाटन का रखडले आहे याची खातरजमा करताना इमारतींची प्रत्यक्ष पहाणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली.
अग्निशमन यंत्रणेसाठी इमारत उभारण्यात आली असून त्याच्याच बाजूला तीन इमारतीमध्ये कर्मचार्यांसाठी प्रशस्त अशी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये सुमारे 24 ते 25 फ्लॅट उपलब्ध असून त्याचेही उद्घाटन झालेले नाही. त्यामुळे 2 वषापूर्वी झालेल्या इमारतीला आणि तेथील वास्तूला गंज चढू लागला आहे. याची प्रत्यक्ष पहाणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली. तसेच याबाबत अधिकार्यांकडे विचारणाही केली. लवकरच या इमारतीचे उद्घाटन केले जाणार असून कर्मचार्यांना निवासाचीही सोय केली जाणार आहे. जर कर्मचारी उपलब्ध नसतील तर अन्य शासकीय कर्मचार्यांना ही निवासस्थानी वापरण्यासाठी दिली जाणार आहेत. जिल्हाधिकार्यांनी एमआयडीसी येथील या अग्निशमन केंद्राच्या नूतन इमारतीला भेट दिल्यामुळे त्याच्या उद्घाटनाची आशा पल्लवीत झाली आहे.
































































