रत्नागिरीत रंगणार थिबा राजवाडा संगीत महोत्सव

389

आर्ट सर्कल रत्नागिरी यांच्यावतीने 24, 25 आणि 26 जानेवारी दरम्यान थिबा राजवाडा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही या महोत्सवाला प्रतिभावान कलाकार लाभले आहेत. विदुषी श्रुती सडोलीकर काटकर, पं. उल्हास कशाळकर, पं. सुरेश तळवलकर या जगप्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीने यंदाचा महोत्सव सजाणारच आहे.

24 जानेवारी रोजी महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. पहिल्या दिवशी डॉ. कनिनिका निनावे आणि पूजा भालेराव यांचे भरतनाट्यम सादर होईल. या नृत्यकीर्तन मध्ये सरस्वती सुब्रमण्यम गायन साथ, अतुल शर्मा बासरी साथ, आणि सतीश कृष्णमूर्ती मृदुंग साथ देतील.त्यानंतर विदुषी श्रुती सडोलीकर काटकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. अजय जोगळेकर संवादिनी साथ तर मंगेश मुळ्ये तबला साथ करणार आहेत. जयपूर अत्रौली घराण्याच्या अध्वर्यू असलेल्या विदुषी श्रुती सडोलीकर महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप करणार आहेत. ही कै. शंकरराव टेंगशे स्मृती मैफल आसमंत बेनेव्होलेन्स यांच्या सहयोगाने होणार आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि. 25 रोजीचा युवा गायिका मुग्धा वैशंपायन हिच्या गायनाने होणार आहे. सुप्रसिद्ध वादक अनंत जोशी मुग्धाला संवादिनी संगत तर स्वप्नील भिसे तबला संगत करणार आहेत.त्यानंतर संतूर वादक संदीप चॅटर्जी, बासरी वादक संतोष संत, तबला वादक पं. रामदास पळसुले आणि पखवाज वादक पं. भवानीशांकर यांची जुगलबंदी रंगणार आहे. प्रसिद्ध फुटबॉल पटू अशोक कुमार चॅटर्जी यांच्या कलाकार सुपुत्राने अर्थात संदीप यांनी वयाच्या 8 व्या वर्षांपासून संतूर शिकायला सुरुवात केली. गुरू पं. तरुण भट्टाचार्य यांच्याकडे गेली 35 वर्षाहुन अधिक काळ शिक्षण घेत आहेत तसंच, पं. अजय चक्रवर्ती यांच्याकडे रागदारी आणि लयकारीचे शिक्षण घेत आहेत. तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य रामदास पळसुले मैफिलीला तबला साथ करणार आहेत. गेली 2 दशके देशातील शिष्याना पारंपरिक गुरुकुल पद्धतीमध्ये प्रशिक्षण देत आहेत. या मैफिलीमध्ये ज्येष्ठ पखवाज वादक पं. भवानी शंकर साथ करणार आहेत. वयाच्या 8 व्या वर्षापासून पखवाज आणि तबला यांचं शिक्षण पं. भवानी शंकर यांनी सुरु केलं. शास्त्रीय संगीत आणि फ्युजन बँड अशा दोन्ही संगीत पद्धतीमध्ये साथ संगत करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी 26 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुरुवातीला असलेले विशेष आकर्षण म्हणजे स्त्री ताल तरंग -लय राग समर्पण घटम सारख्या पुरुषी वर्चस्व असलेल्या वाद्यावर घटम वादक सुकन्या रामगोपाल यांनी जबरदस्त प्रभुत्व प्राप्त केलं आहे. हिंदुस्तानातील त्या पहिल्या स्त्री घटमवादकआहेत. वेगवेगळ्या श्रुतीचे 6 ते 7 घटम एकत्र ठेवून त्यातून अप्रतिम तालनिर्मिती करणारा घटतरंग हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. सर्व वादक स्त्री कलाकार आहेत. व्हायोलिन सौम्या रामचंद्रन, मृदुंग लक्ष्मी पिल्लई, वीणा वाय. जी. श्रीलता, तर मोर्चीग भाग्यलक्ष्मी असा वाद्यमेळ आणि कलाकार आहेत. महोत्सवाचा समारोप ज्येष्ठ कलाकार पं. उल्हास कशाळकर यांच्या सादरीकरणाने होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या