रावणाचं शीर जळलं नाही म्हणून कर्मचाऱ्याला निलंबित केलं, पालिकेच्या चार अधिकाऱ्यांना नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दसऱ्याला रावणदहनाच्या वेळी रावणाचं शीर जळलं नाही, म्हणून एका पालिका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं. त्यासोबतच पालिकेच्या चार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. या अजब प्रकारावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ही घटना छत्तीसगढ येथील धमतरी जिल्ह्यात घडली आहे. बुधवारी दसऱ्याला रावण दहन झालं. त्यावेळी रावणाचा पुतळा पूर्ण जळला नाही. त्याच्या शिराचा भाग तसाच राहिला. दसऱ्यासाठी रावण तयार करण्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून धमतरी पालिकेतील कर्मचारी राजेंद्र यादव याला निलंबित करण्यात आलं.

यासोबत पालिकेचे चार अधिकारी विजय मेहरा, लोमस देवांगन, कमलेश ठाकूर, कामता नागेंद्र या चार जणांना पालिका आयुक्तांची कारणे दाखवा नोटीसही आली आहे. दरवर्षी पालिकेतर्फे हा पुतळा तयार करण्यात येतो. बुधवारी जेव्हा रावण दहनासाठी रावणाचा पुतळा आणला गेला, तेव्हा त्याचा पुतळा पाहून तिथे उपस्थित लोक हसू लागले.

त्यानंतर जेव्हा रावण दहन झालं तेव्हा पुतळा पूर्णपणे जळला नाही. त्याच्या डोक्याचा भाग तसाच राहिला. त्यामुळे पालिकेची बदनामी झाल्याचा ठपका ठेवून कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.