नऊ थरांचीच ‘नव’लाई! ‘खोपटचा राजा’  मंडळाची नऊ थरांची कडक सलामी

मुंबईच्या मंडळांचा रेकॉर्ड या वर्षी ठाण्यातल्या दहीहंडी मंडळाने मोडला आहे. ‘खोपटचा राजा’  या मंडळाने पॅसल मिल येथे  नऊ थरांची कडक सलामी दिली.

गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या ताह्या बाळा…, बोल बजरंग बली की जय आणि बाळकृष्णाच्या जयजयकाराने दुमदुमून गेलेला आसमंत, डीजे-ढोलताशाचा दणदणाट, डोळय़ांचे पारणे फेडणाऱ्या संस्कृती-परंपरेचे दर्शन, प्रचंड उत्साह आणि श्वास रोखून धरायला लावणारी गोविंदांची हंडीच्या दिशेने चढाई… लोण्याची लयलूट आणि बक्षिसांचा वर्षाव… अशा प्रचंड उत्साही वातावरणात आज मुंबईत दहीहंडी उत्सव पार पडला. गोविंदांचा उत्साह शिगेला पोहचला असताना पावसानेही जोरदार सलामी दिल्याने गोपाळकाल्याला अक्षरशः उधाणच आले. बडय़ा गोविंदा पथकांकडून दहा थर लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र या वर्षीही यश आले नाही. त्यामुळे या वर्षीही नऊ थरांचीच ‘नव’लाई कायम राहिली.