
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. मात्र रेमेडेसीवरचा तुटवडा निर्माण झाल्याने तसेच साठेबाजी होऊ लागल्याने काळाबाजार वाढला आहे. तिप्पट-चौपट किंमत घेऊन इंजेक्शन विकले जात आहे.
याला आळा घालण्यासाठी तसेच इंजेक्शनची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी रेमेडेसिवीरचा समावेश जीवरक्षक औषधांमध्ये करा अशी मागणी ऑर्गनाईज्ड मेडिसिन ऍकेडेमिक गिल्डने (ओमाग) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
‘ओमाग’ने यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना आज पत्र पाठवले. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी स्टेरॉईड्स आणि रेमेडेसिवीर हीच औषधे प्रभावी ठरत आहेत. रेमेडेसिवीरचे पेटंट गिलियाड या कंपनीकडे असून तिने हिंदुस्थानातील सहा औषध कंपन्यांना या इंजेक्शनच्या निर्मितीसाठी परवाना दिला आहे.
इंजेक्शनची किंमत 2800 रुपये ते 5400 रुपये अशी कंपन्यांनुसार वेगवेगळी आहे. प्रत्येक रुग्णाला किमान सहा डोस लागतात आणि हे इंजेक्शन मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या कोविड संसर्गामध्येच वापरावे लागते. हिंदुस्थानात जेनेरीक म्हणजेच स्वदेशी रेमडेसिवीरचीही निर्मिती करण्याची अनेक कंपन्यांची क्षमता आहे. त्यांना त्यासाठी सरकारने परवाना द्यावा, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
‘रेमडेसिवीर’ बँका बनवा
रेमडेसिवीर इंजेक्शनचा गैरवापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने रेमडेसिवीरचे स्टोअर्स किंवा बँका बनवाव्यात. तिथूनच रुग्णांना इंजेक्शनचा पुरवठा केला जावा. तसेच या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱयांविरुध्द संसर्गजन्य आजार अधिनियमांतर्गत कडक कारवाई करावी अशाही मागण्या या पत्रात करण्यात आल्या आहेत.




























































