
माजी क्रिकेटपटू, पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार गौतम गंभीर यांना धमकीचा ई-मेल मिळाला आहे. मंगळवारी सकाळी हा ई-मेल आला आहे. या मेलमधून गंभीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘इसिस कश्मीर’ (ISIS Kashmir) कडून गंभीर यांना ठार मारण्यात येईल, असे या ई-मेलमधून सांगण्यात आले आहे.
धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर गौतम गंभीर यांनी दिल्ली पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांची भेट घेऊन आपली तक्रार नोंदविली. तक्रार दाखल झ्याल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे. पोलिसांकडून ई-मेलची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी गौतम गंभीर अनेकदा चर्चेत राहिले आहेत. नुकतेच त्यांनी पंजाब काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना लक्ष्य केलं होतं.
सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपला ‘मोठा भाऊ’ संबोधलं होतं. यावर, ‘अगोदर आपल्या मुलांना सीमेवर पाठवा त्यानंतर अशी वक्तव्य करा’ असा टोला गौतम गंभीर यांनी सिद्धूंना लगावला होता.
हिंदुस्थान गेल्या 70 वर्षांपासून पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरुद्ध लढत आहे. सिद्धूंनी एका दहशतवादी देशाच्या पंतप्रधानांना आपला मोठा भाऊ म्हणणं ‘लज्जास्पद’ असल्याचं वक्तव्य गौतम गंभीर यांनी केलं होतं.
आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही त्यांनी टीका केली होती. ‘दिल्लीचे मुख्यमंत्री राम जन्मभूमी स्थळावर पूजा करून आपली पापं धुण्याचा प्रयत्न करत असल्याचं’ गंभीर यांनी म्हटलं होतं.
‘काही बाबतीत ‘MIM’ सारखे पक्ष केजरीवाल यांच्याहून बरे आहेत, कमीत कमी आपला धार्मिक अजेंडा आणि कामावर ते ठाम तरी आहेत’, असं म्हणत त्यांनी MIM आणि ‘आप’ची तुलना केली होती.




























































