
>> डॉ. अनिल कुलकर्णी
व्यंकटेश सोळंके यांचं ‘अक्षरायण’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. एकूण 19 पुस्तकांचा परिचय त्यांनी आपल्या या पुस्तकात केला आहे. साहित्यकृतीतील भावनात्मक द्वंद्वाचे कल्लोळ, मनाचे अंतरंग व सकारात्मक संदेश यातील प्रत्येक साहित्यकृतीतून लेखकाला जे जाणवले ते त्यांनी यात चितारले आहे. या पुस्तकातील काही पुस्तके विद्यापीठीय अभ्यासक्रमात आहेत.
कादंबरी, कविता, कथा यांचा परामर्श लेखकाने घेतला आहे. कादंबरी हा प्रसंग, पात्र, स्थळ व काळ या एकंदरीत परिस्थितीच्या प्रतलात बंदिस्त न होता मानवीय वैचारिक विश्वाचा गुंता मांडत सामाजिक भान जपणारा व्यापक विषय असतो. ‘मातीखालचे पाय’ ही बाबू बिराजदार यांची कादंबरी, ज्यामध्ये सामाजिक व मानसिक द्वंद्वाचा सिद्धांत मांडला आहे.
‘पाच आऱ्यांचं चाक’ ही याज्ञसेनीच्या सूडाचा प्रवास मांडणारी कादंबरी आहे. महाभारतासारख्या ग्रंथाचं समाजमनाशी भावनिक नातं असतं, ते नातं जपत त्यातील श्रद्धा, धारणा व चमत्कृतीचे विवेचन व विस्तार हा लेखकासाठी कसरतीचा भाग असतो. आपण ज्या गावात राहतो त्या संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज व महात्मा गांधी यांच्या एकंदरीत गुणांचा मिलाफ असणारे आधुनिक समाजसुधारक सखाबाबाच्या रूपात लेखकाने ‘गावकळा’ या कादंबरीत साकारलेला आहे.
कादंबरी एक सर्वसमावेशक शक्यतांचा विस्तार असते याचा प्रत्यय ‘नदिष्ट’ही कादंबरी वाचताना येतो. हिंदुस्थानी वर्तमान व भविष्याचं वाळवंट ‘पांढरकवडय़ा’ कादंबरीत लेखकाने चितारलं आहे. ‘मातीत हरवल्या कविता’ हा संतोष आळसकर यांचा पहिलाच कवितासंग्रह, एका कसदार कवीने शेती, माती व तेथील गावगाडा व वाडय़ाचे संवेदन, लेखन या कवितेचा अर्थपूर्ण आत्मा आहे. बालमनावर संस्कार बिंबवणारा कवितासंग्रह म्हणजे ‘थेंब फुले’. सामाजिक आशय मांडताना विद्यार्थ्यांना बोधपर शिक्षण घडवणाऱया व श्रमप्रतिष्ठा शिकवत सर्वच कविता संस्काराच्या भावविश्वात घेऊन जातात.माय व माती यांचे नातं सांगणाऱया काही कविता ‘माती शाबूत राहावी म्हणून…’मध्ये आहेत. ‘पुन्हा फुटतो भादवा’मध्ये काटकसरीचे अर्थशास्त्र्ा मांडणाऱया भावस्पर्शी कविता आहेत. तसेच काही कथासंग्रहांचाही परामर्श लेखकाने घेतला आहे. काळोख्या अवकाशात अगतिकतेचा इतिहास मांडणाऱया कविता ‘काळोखाच्या कविता’ या कवितासंग्रहात आहेत.
कादंबरी, कवितासंग्रह व कथासंग्रह निवडताना त्यांचे निकष काय होते, तसेच त्यांची संदर्भसूची देणे हे आवश्यक होते.
अक्षरायण
लेखक : व्यंकटेश सोळंके
प्रकाशक : गणगोत प्रकाशन
मूल्य : रुपये 270/-



























































