रुपाली चाकणकर यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला नगरमध्ये अटक करण्यात आली आहे. नगर तालुका पोलिसांनी मंगलवारी सकाळी चिंचोडी पाटील (ता. नगर) येथून आरोपीला अटक ताब्यात घेतले. भाऊसाहेब रामदास शिंदे (रा. भेंडा ता. नेवासे) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

रूपाली चाकणकर मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात असताना त्यांना धमकीचा फोन आला होता. घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आरोपीला शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली असून पुढील चौकशी सुरू केली आहे. सदर आरोपीला पुणे गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आल्याचे नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.

रुपाली चाकणकर यांची 24 तासात हत्या करू अशी धमकी देण्यात आली होती. नगरमधील व्यक्तीने हा फोन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरली. सदर आरोपी नेवासा तालुक्यातला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एक पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले. सहायक निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या पथकाने चिंचोडी पाटील गावातून भाऊसाहेब शिंदे याला ताब्यात घेतले आहे.